स्वतंत्र समितीचा अहवाल मंत्रालयाला सादर

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत शर्यतीदरम्यान पाणी तसेच ऊर्जापेय न मिळाल्याची तक्रार भारताची धावपटू ओ.पी. जैशा हिने केली होती. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने तिचे प्रशिक्षक निकोलाइ स्नेसारेव्ह यांना दोषी ठरवले आहे. ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे जैशाला रुग्णालयात दाखल करावे लागले. शर्यतीदरम्यान पाणी तसेच ऊर्जापेय मिळाले नसल्याचा आरोप जैशाने केला होता. याप्रकरणी आरोपांच्या फैरी झडल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने याप्रकरणाची शहानिशा करण्यासाठी समिती नेमली होती.

या समितीने दोन पानी अहवाल क्रीडा मंत्रालयाला सादर केला. स्नेसारेव्ह यांनी जैशाला वैयक्तिक ऊर्जापेयांपासून नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात स्नेसारेव्ह यांनी शर्यतीच्या पूर्वसंध्येला विचारणा केली होती. मात्र त्यांनी नकार दिला. मात्र यासंदर्भात जैशाला संघव्यवस्थापनाने याबाबत विचारले की प्रशिक्षकांनी, याबाबतचा कोणताही ठोस पुरावा अहवालात नाही.

दरम्यान जैशाने वैयक्तिक ऊर्जापेयाची मागणी केली नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. ऑलिम्पिकमध्ये शर्यतीनंतर वैयक्तिक ऊर्जापेय मिळाली नसल्याची तक्रारही जैशाने केली होती.

सर्व देशांच्या धावपटूंना शर्यतीदरम्यान पाणी उपलब्ध होते. मात्र पाणीकेंद्रात भारतीय अ‍ॅथलेटिक्स पदाधिकारी उपस्थित नव्हते. याबाबत विचारणा केल्यावर जैशाने वैयक्तिक ऊर्जा पेयाची मागणी केली नव्हती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.