अपंगांच्या स्पर्धेतील झालेल्या सदोष संयोजनाच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सर्व खेळांच्या राष्ट्रीय संघटनांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाचे नीटनेटके संयोजन करण्याचे आवाहन केले आहे.
मंत्रालयाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय स्पर्धाचे वेळापत्रकाचे योग्य नियोजन करावे, खेळाडूंना अग्रस्थानी ठेवीत त्यांच्या प्राथमिक सुविधांबाबत योग्य ती काळजी घेतली पाहिजे. क्रीडा सुविधा व खेळाडूंच्या सोयी सुविधा याबाबत सदैव दक्ष असले पाहिजे. स्पर्धाचे सुरळीत संयोजन केले पाहिजे.
शासकीय नियमावलीनुसार प्रत्येक संघटनेने वरिष्ठ, कुमार व सबज्युनिअर अशा विभागाच्या दरवर्षी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणे अनिवार्य आहे. तसेच काही संघटनांतर्फे आंतरविभागीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धाचेही आयोजन केले जाते. मात्र अशा स्पर्धामध्ये खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या प्राथमिक सुविधांचाही अभाव असतो अशा तक्रारी शासनाकडे आल्या आहेत. त्यामुळेच मंत्रालयाने सर्व खेळांच्या राष्ट्रीय संघटनांना त्याबाबत सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे.
खेळाडूंसाठी स्वच्छ व चांगली निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, मैदानावर वैद्यकीय मदत केंद्रे आदी प्राथमिक सुविधा अनिवार्य आहेत. त्याबाबत संयोजकांनी काळजी घेतली पाहिजे, असेही मंत्रालयाने आवाहन केले आहे.