बॅडमिंटनच्या महिला दुहेरीतील भारताची अव्वल जोडी ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांना ऑलिम्पिक पदक व्यासपीठ (टॉप) योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून आर्थिक पाठबळ मिळणार हे निश्चित झाले आहे.
या जोडीला सुरुवातीला या योजनेंतर्गत आर्थिक सहकार्य मिळाले नव्हते. त्यास या समितीवर काम करणारे राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद हेच जबाबदार आहेत अशी टीका ज्वाला व अश्विनी यांनी केली होती. गोपीचंद यांनी ज्वाला व अश्विनी यांना आर्थिक सहकार्य करण्यात कोणताही अडचण नाही असे नुकतेच जाहीर केले होते. ज्वाला व अश्विनी ही आपल्या देशातील सर्वोत्तम जोडी असल्यामुळे या जोडीला परदेशी प्रशिक्षकांद्वारे मार्गदर्शन घेण्यास परवानगी दिली आहे. तसेच अन्य काही अव्वल बॅडमिंटनपटूंनाही या योजनेत समाविष्ट केले जाईल. गोपीचंद यांची शिफारस असो व नसो, आम्ही या जोडीला आर्थिक पाठबळ देण्याचे यापूर्वीच निश्चित केले होते. त्यामुळे त्यांनी गोपीचंद यांच्यावर टीका करायला नको होती. गोपीचंद हे अनेक युवा खेळाडूंसाठी आदर्श खेळाडू आहेत. भारतीय पायाभूत सुविधा वित्त कंपनीने या योजनेसाठी दिलेल्या दहा कोटी रुपयांच्या निधीतून या जोडीस मदत केली जाईल, असे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
सायना नेहवाल हिच्याबरोबरच पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणोय, आरएमव्ही गुरुसाईदत्त, पी. व्ही. सिंधू यांना सरकारने या योजनेद्वारे आर्थिक सहकार्य केले आहे.