केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात क्रीडाक्षेत्रासाठी गेल्या वर्षीपेक्षा २१४ कोटी रुपयांची वाढीव तरतूद करत क्रीडाक्षेत्राला दिलासा दिला आहे. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय मंत्रालयाला १२१९ कोटी रुपये अर्थमंत्र्यांनी मंजूर केले आहेत. गेल्या वर्षी ११५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर त्यात सुधारणा करून क्रीडाक्षेत्राला १००५.६० कोटी रुपये देण्यात आले होते. पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा इन्स्टिटय़ूटमध्ये प्रशिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी २५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

अर्थसंकल्पात क्रीडाक्षेत्रासाठी
*  खेळांसाठी ७९२.७२ कोटी तर युवा कल्याण मोहिमेसाठी ३०१ कोटी रुपये
*  ईशान्येकडील राज्ये आणि सिक्किमसाठी १०९.४० कोटी रुपये
*  भारतीय क्रीडा प्राधिकरणाला ३२६ कोटी रुपये खेळांसाठी, १६० कोटी रुपये राष्ट्रीय क्रीडा संघटनांसाठी आणि युवा शोधमोहिमेसाठी १० कोटी रुपये
*  उत्तेजक विरोधी मोहिमेसाठी ८.३० कोटी रुपये, राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेसाठी ५.७० कोटी रुपये
*  पंचायत युवा क्रीडा आणि खेळ मोहिमेसाठी १८० कोटी रुपये, ग्रामीण क्रीडा पायाभूत सुविधांसाठी ४५ कोटी रुपये मंजूर
*  राष्ट्रीय क्रीडा विकास निधीसाठी पाच कोटी रुपये
*  युवा कल्याण मोहिमेपैकी १२७.४८ कोटी रुपये नेहरू युवा केंद्र संघटनेसाठी तर राष्ट्रीय सेवा मोहिमेसाठी ७६.३१ कोटी रुपये
*  लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण इन्स्टिटय़ूटसाठी २० कोटी रुपये
राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास इन्स्टिटय़ूटसाठी २ कोटी रुपये.