ए बी डी’व्हिलियर्सने कर्णधारपदाला साजेसा खेळ केल्यामुळेच त्याच्या दक्षिण आफ्रिका संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सहा विकेट राखून विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ४५.१ षटकांत सर्वबाद २३० धावा केल्या. त्यामध्ये लुक रोंची याने केलेल्या शानदार ९९ धावांचा समावेश होता. त्याने ११ चौकार व ३ षटकार अशी आतषबाजी केली. टॉम लॅथम याने २९ धावा करीत त्याला साथ दिली. आफ्रिकेच्या व्हर्नन फिलँडर, मॉर्ने मॉर्केल, इम्रान ताहीर व रियान मॅक्लेरेन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. आफ्रिकेने विजयासाठी असलेले २३१ धावांचे आव्हान ४८.१ षटकांत पार केले. त्याचे श्रेय डी’व्हिलियर्स व जे पी डय़ुमिनी यांनी केलेल्या १३९ धावांच्या नाबाद भागीदारीला द्यावे लागेल. डी’व्हिलिअर्सने नाबाद ८९ धावा केल्या तर डय़ुमिनी याने आक्रमक खेळ करीत नाबाद ५८ धावा केल्या.

कसोटी क्रमवारीत अग्रस्थानाचे ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य
दुबई : पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयासह जागतिक कसोटी क्रमवारीत अग्रस्थान मिळवण्याच्या ध्येयानेच ऑस्ट्रेलिया खेळणार आहे. पहिल्या सामन्याला येथे बुधवारपासून प्रारंभ होत आहे. दोन्ही सामने जिंकले तर ऑस्ट्रेलियाचा संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेईल. सध्या अग्रस्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेपेक्षा ते एक गुणाने खाली आहेत. त्यांनी ही मालिका १-० अशी जिंकली तर त्यांचे आफ्रिकेइतकेच गुण होतील. मात्र सरासरीचा निकष लावून आफ्रिकेकडेच अग्रस्थान राहील. मात्र पाकिस्तानने १-० असा विजय मिळविला तर ते चौथ्या क्रमांकावर पोहोचतील आणि २-० असा विजय मिळविला तर पाकिस्तानला तिसऱ्या स्थानावर झेप घेण्याची संधी असेल.

तंदुरुस्त वॉटसनचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन
सिडनी : दुखापतीमधून तंदुरुस्त झालेल्या शेन वॉटसनचे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात पुनरागमन केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी त्याला संधी मिळाली आहे. त्याच्याबरोबरच यष्टीरक्षक म्हणून बेन डंकही संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व आरोन फिन्च सांभाळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ : आरोन फिन्च (कर्णधार), सीन अ‍ॅबोट, डग बोलिंगर, कॅमेरून बॉयसे, पॅट कमिन्स, बेन कटिंग, बेन डंक, जेम्स फॉल्कनर, निक मॅडिन्सन, नॅथन रिअरडॉन, केन रिचर्डसन, शेन वॉटसन, कॅमेरून व्हाइट.