* गावस्करच्या प्रथम श्रेणीमधील ८१ शतकांच्या विक्रमाची सचिनने साधली बरोबरी
* सचिनने ओलांडला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २५हजार धावांचा टप्पा

मुंबईचा लिटलमास्टर सुनील गावस्कर म्हणजे भारतीय क्रिकेटचा भूतकाळ तर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे वर्तमान. गावस्कर यांच्या पावलांवर पाऊल ठेवत विक्रमांचे अनेक एव्हरेस्ट पादाक्रांत करणाऱ्या सचिनने शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर समस्त मुंबईकरांना शतकाची मेजवानी पेश केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सचिनच्या या ८१व्या शतकाने गावस्कर यांच्या ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी साधली. याशिवाय या अभिजात फलंदाजाने १०४ धावा केल्या, तेव्हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २५ हजार धावांचा टप्पा ओलांडण्याची किमया साधली.
शुक्रवारी सकाळी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या सचिनने एस. श्रीशांतला मिड-ऑफला चौकार ठोकून ९९ हा आकडा गाठला. त्यानंतर श्रीशांतलाच एकेरी धाव घेत सचिनने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ८१व्या शतकावर शिक्कामोर्तब केले. सचिनच्या नावावर १९४ कसोटी सामन्यांतील ५१ शतकांचाही समावेश आहे. गावस्कर यांनी १९७१ ते १९८७ या कालखंडात १२५ कसोटी सामन्यांतील ३४ शतकांनिशी एकंदर ८१ शतके झळकावली होती. नाबाद १४० धावांची यादगार खेळी साकारणाऱ्या सचिनच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील खात्यावर २५,०३६ धावा जमा आहेत. तथापि, गावस्कर यांच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २५,८३४ धावांची पुंजी जमा आहे. डिसेंबर १९८८मध्ये वानखेडे स्टेडियमच्याच साक्षीने गुजरातविरुद्ध सचिनने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक साकारले होते.
शतकांचा लेखाजोखा
प्रकार    सुनील     सचिन
    गावस्कर    तेंडुलकर
कसोटी    ३४    ५१
रणजी    २०    १८
इराणी    ३    २
दुलीप    ६    ३
शेष विश्वासाठी    १    –
कौंटी    २    १
अन्य सामने    १५    ६
एकूण    ८१    ८१