ऑस्ट्रेलियावर १०६ धावांनी मात;२६ निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम

सुरेख एकत्रित कामगिरीच्या जोरावर संक्रमणावस्थेतील श्रीलंका संघाने पल्लेकल कसोटीत बलाढय़ ऑस्ट्रेलियावर १०६ धावांनी मात करत खळबळजनक विजयाची नोंद केली. श्रीलंकेचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा केवळ दुसरा कसोटी विजय आहे. विजय मिळवतानाच श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सलग २६ षटके निर्धाव टाकण्याचा पराक्रमही केला. ३८ वर्षीय रंगना हेराथ आणि २५ वर्षीय लक्षण संदकन या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथला कर्णधार म्हणून पत्करावा लागलेला हा पहिलाच पराभव आहे. या विजयासह श्रीलंकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

पाचव्या आणि निर्णायक दिवशी ऑस्ट्रेलियाला १८५ धावांची आवश्यकता होती. रंगना हेराथने अ‍ॅडम व्होजेसला बाद करत ही जोडी फोडली. धनंजय डिसिल्व्हाच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत स्टीव्हन स्मिथने अर्धशतक पूर्ण केले. स्मिथ आणि मिचेल मार्श जोडी स्थिरावली असे वाटत असतानाच हेराथने मार्शला पायचीत पकडले. त्याने २५ धावांची खेळी केली. संदकनच्या गोलंदाजीवर स्मिथला बाद देण्यात आले. मात्र पंच पुनर्आढावा पद्धतीने स्मिथला जीवदान दिले. मात्र पुढच्याच षटकात हेराथने स्मिथला पायचीत करत श्रीलंकेच्या विजयातला मोठा अडसर दूर केला. त्याने ५५ धावांची खेळी साकारली. संदकनने मिचेल स्टार्कला भोपळाही फोडू दिला नाही.

नॅथन लियॉनचा प्रतिकार संदकनने संपुष्टात आणला. त्याने ८ धावा केल्या. यानंतर एकत्र आलेल्या स्टीव्हन ओ कफी आणि पीटर नेव्हिल जोडीने तब्बल १७८ चेंडू किल्ला लढवला. यादरम्यान श्रीलंकेच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांना केवळ ४ धावा करता आल्या. पावसाळी वातावरण आणि या जोडीच्या चिवट फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया कसोटी अनिर्णित राखणार अशी चिन्हे होती. धनंजय डिसिल्व्हाने नेव्हिलला बाद करत ही जोडी फोडली. नेव्हिलने ११५ चेंडूत ९ धावा करत पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. हेराथने स्टीव्हन ओ कफीला त्रिफळाचीत करत श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हेराथने ५ तर संदकनने ३ बळी घेतले.

धावफलक

श्रीलंका ११७ आणि ३५३ विजयी विरुद्ध ऑस्ट्रेलिया २०३ आणि १६१ (स्टीव्हन स्मिथ ५५, रंगना हेराथ ५/५४)

सामनावीर : कुशल मेंडिस

  • श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला हा केवळ दुसरा कसोटी विजय आहे. यापूर्वी १९९९ साली श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता.
  • सलग १५४ चेंडू अर्थात २५.४ षटके एकही धाव झाली नाही. ६२व्या षटकाचा शेवटचा चेंडू ते ८८.३ या कालावधीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी कसोटी वाचवण्यासाठी जवळपास २६ निर्धाव षटके खेळून काढली.
  • पीटर नेव्हिल आणि स्टीव्हन ओ कफी या जोडीने नवव्या विकेटसाठी १७८ चेंडूत ४ धावा करत पराभव टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तो अपुराच ठरला.