सातत्यपूर्ण कामगिरी दाखवणारा किदम्बी श्रीकांत आणि दोन वेळा कांस्यपदकाला गवसणी घालणारी पी. व्ही. सिंधू यांच्याकडून जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा धरता येईल. सोमवारपासून सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी २१ सदस्यीय भारतीय चमू सज्ज झाला आहे.

इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया येथील बॅडमिंटन स्पर्धाचे सलग विजेतेपद प्राप्त करणाऱ्या श्रीकांतला आता पहिलेवहिले जागतिक पदक खुणावते आहे. सलग तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारल्यामुळे श्रीकांतच्या आव्हानाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाला गवसणी घालणाऱ्या सिंधूने गतवर्षी चायना खुली आणि या वर्षी इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. २०१३ व २०१४मध्ये कांस्यपदकावर नाव कोरणाऱ्या सिंधूने पदकाचा रंग बदलण्याचा निर्धार केला आहे.

२०१५मध्ये सायना नेहवाल जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली होती. तंदुरुस्तीशी निगडित अडथळे पार करून तीसुद्धा जागतिक स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे.

सिंधू आणि सायना या दोन्ही भारतीय खेळाडूंना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. दुसऱ्या फेरीत सिंधूला कोरियाची किम हय़ो मिन किंवा इजिप्तची हॅदिना हॉस्नी यांच्यापैकी एकीशी लढावे लागेल. उपांत्यपूर्व फेरीत तिची चीनच्या सन यू हिच्याशी गाठ पडण्याची दाट शक्यता आहे. सायनाची दुसऱ्या फेरीत सॅब्रिना जॅकेट (स्वित्र्झलड)  नताल्या व्हॉयत्सेख (युक्रेन) यांच्या सामन्यातील विजयी खेळाडूशी सामना होईल. उपउपांत्यपूर्व फेरीत सायनाला कोरियाच्या द्वितीय मानांकित संग जि हय़ूनशी झुंजावे लागणार आहे.

यंदाच्या बॅडमिंटन हंगामात भारतीय पुरुष बॅडिमटनपटूंनी सहा विजेतेपदांवर मोहर उमटवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. १५व्या मानांकित बी. साईप्रणीतने सिंगापूरला पहिल्यावहिल्या सुपर सीरिज विजेतेपदाचा मान मिळवला. त्यानंतर त्याने थायलंड ग्रँड प्रिक्स सुवर्णचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावले. पहिल्या फेरीत प्रणीतची हाँगकाँगच्या वेई नॅनशी गाठ पडणार आहे.

याचप्रमाणे समीर वर्माने लखनौ येथे सय्यद मोदी ग्रँड प्रिक्स सुवर्णचषक स्पर्धा जिंकली. प्रथमच जागतिक स्पर्धेत खेळणाऱ्या समीरला मुख्य स्पर्धेत थेट प्रवेश दिला असून, पहिल्या फेरीत स्पेनच्या पाबलो अबियानशी त्याचा सामना होणार आहे.

पुरुष दुहेरीत रिओ ऑलिम्पिकपटू मने अत्री आणि बी. सुमित रेड्डी, चिराग सेन आणि सत्वीकसाईराज रणकीरेड्डी, अर्जुन एम. आर. आणि रामचंद्रन श्लोक या जोडय़ा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मिश्र दुहेरीत सुमित आणि अश्विनी पोनप्पा, प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी, सत्त्विक आणि मनीषा के. या जोडय़ा खेळणार आहेत. याशिवाय महिला दुहेरीत अश्विनी-सिक्की, मेघना जक्कामपुडी-पूर्विशा एस. राम, संजना संतोष-सारा सुनील यांच्यावर भारताची मदार असेल.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारत पदकांची लयलूट करील, अशी आशा आहे. भारताचा चमू सर्वात आव्हानात्मक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय पुरुष खेळाडूंनीही अप्रतिम कामगिरी बजावली आहे. चार भारतीय खेळाडूंकडे जागतिक यश मिळवण्याची क्षमता आहे. कोणतेही निश्चित अंदाज व्यक्त करणे कठीण असले तरी भारतीय खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा नक्की करता येईल.  पुलेला गोपीचंद, भारताचे प्रशिक्षक