मनमाड शहरातील पहिल्यावहिल्या मनमाड कबड्डी प्रीमियर लीग २०१५ या महत्त्वाकांक्षी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुमारे पाच हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली. स्टार फायटर्सने रुद्रा रायडरचा २६-२३ अशा अवघ्या तीन गुणांनी पराभव करून पहिल्या मनमाड प्रीमियर कबड्डी लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

मनमाड येथील पंडितराव सांगळे क्रीडानगरीत प्रो कबड्डीच्या धर्तीवर झालेल्या या अनोख्या आणि कबड्डीप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळालेल्या स्पर्धेची अंतिम फेरी अखेपर्यंत उत्कंठावर्धक ठरली. स्टार फायटर्स आणि रुद्रा रायडर या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच अचूक पकड आणि आक्रमक चढाई हे धोरण अवलंबले, मध्यंतरास रुद्रा रायडर तीन गुणांनी आघाडीवर होता. मध्यंतरानंतर मात्र चित्र पालटले. स्टारच्या खेळाडूंनी अंतिम टप्प्यात रुद्रावर तीन गुणांनी मात केली. विजेत्या संघाचे मालक रफिक खान, तर प्रशिक्षक राजेश निकुंभ हे आहेत. उपविजेत्या रुद्रा रायडरचे मालक डॉ. शरद शिंदे, तर प्रशिक्षक सुनील दराडे हे आहेत. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्टार फायटर्स या संघाला १५ हजार रुपये व चषक, उपविजेत्या रुद्रा रायडरला ११ हजार रुपये रोख व चषक, तसेच तृतीय, चतुर्थ व पाचव्या क्रमाकांपर्यंतच्या संघांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून स्टार रायडर्सचा अक्षय हिरे, उत्कृष्ट चढाईपटू म्हणून ब्लू पँथर्सचा अविनाश घोगले, उत्कृष्ट पकडीसाठी स्टारचा सुधीर उबाळे तर आदर्श खेळाडू म्हणून गोल्डन बॉईजच्या अजय सोनवणे यास गौरविण्यात आले. शिस्तबद्ध संघ म्हणून ब्लू पॅथर्स संघाची निवड झाली.