उत्कर्ष काळे (पुणे) व सागर मारकड (इंदापूर) यांनी सुवर्णपदकांची कमाई करीत ६०व्या ‘महाराष्ट्र केसरी’ राज्य कुस्ती स्पर्धेत शानदार सलामी केली.

वारजे येथील रमेश वांजळे मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत उत्कर्षने गादी विभागातील ६५ किलो गटात वर्चस्व गाजवले. त्याने पुणे जिल्हा संघाचा मल्ल सागर लोखंडेवर मात केली. पहिल्या फेरीत त्याने ४-२ अशी आघाडी घेतली. त्याने आपल्या प्रतिस्पध्र्याला दुसऱ्या फेरीत फेरीत फारशी संधी दिली नाही. त्याने अप्रतिम डाव टाकून दोन गुण वसूल करत ही कुस्ती जिंकली. ६५ किलो माती विभागात कोल्हापूर शहर संघाच्या माणिक कारंडेने कोल्हापूर जिल्हा संघाचा खेळाडू सोनबा गोगाणेला उत्कंठापूर्ण लढतीनंतर हरवले. दोन्ही खेळाडूंनी ताकदीच्या जोरावर प्रत्येकी तीन गुण मिळवले. ही लढत बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच सोनबाने अखेरच्या काही सेकंदांमध्ये आणखी एक गुण मिळाला आणि लढत जिंकली.

माती विभागातील ५७ किलो गटात सागर मारकडने अंतिम फेरीत सोलापूरच्या ज्योतिबा अटकळेला चीतपट करत  विजय मिळवला. त्याने चौथ्या मिनिटाला कलाजंग डावाचा उपयोग केला.