दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभवांमुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघावर जोरदार टीका झाली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघात घाऊक बदलही केले होते. नशीब पालटावे यासाठी नवीन खेळाडूंचा भरणा करण्यात आला. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय मालिकेत कर्णधार स्टीव्हन स्मिथनेच स्वबळावर संघाला विजय मिळवून दिला. मॅरेथॉन शतकी खेळी, अफलातून झेल आणि चतुरस्त्र नेतृत्त्व अशा सर्वागीण कौशल्याच्या जोरावर स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र आरोन फिंच (०) आणि डेव्हिड वॉर्नर (२४) हे सलामीवीर झटपट माघारी परतले. जॉर्ज बेलीही १७ धावांवर बाद झाला. सहकारी नियमित अंतरात बाद होत असताना स्मिथने एकेरी, दुहेरी धावांसह चौकारांची आतषबाजी करत धावफलक हलता ठेवला. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात मिचेल मार्श धावबाद झाला. मात्र यानंतर स्मिथने ट्रॅव्हिस हेडच्या साथीने पाचव्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेत स्मिथने मोठय़ा धावसंख्येचा पाया रचला. फग्र्युसनच्या गोलंदाजीवर दोन धावा घेत स्मिथने एकदिवसीय प्रकारातील . तर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय शतकाची नोंद केली. या खेळीदरम्यान स्मिथने २०१६ कॅलेंडर वर्षांत हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत हेडने अर्धशतक पूर्ण केले. ट्रेंट बोल्टने हेडची खेळी संपुष्टात आणले. त्याने ५२ धावांची खेळी केली. शतकानंतर स्मिथने आक्रमणाची तीव्रता वाढवली. ट्रेंट बोल्टने स्मिथची खेळी संपुष्टात आणली. त्याने १४ चौकार आणि ४ षटकारांसह १६४ धावांची खेळी साकारली. या खेळीदरम्यान स्मिथला दोनदा जीवनदान मिळाले. मॅथ्यू वेडने २२ चेंडूत ३८ धावांची वेगवान खेळी केली. ऑस्ट्रेलियाने ३२४ धावांची मजल मारली. मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट आणि जेम्स नीशाम यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना मार्टिन गप्तीलने एकाकी झुंज दिली. मात्र न्यूझीलंडने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. भरवशाचे टॉम लॅथम (२), केन विल्यमसन (९) झटपट बाद झाल्याने न्यूझीलंडच्या धावगतीला वेसण बसली. मार्शच्या गोलंदाजीवर षटकारासह गप्तीलने शतक पूर्ण केले. मात्र फिरकीपटू अ‍ॅडम झंपाने दोन षटकांच्या अंतरात गप्तील (१११), मिचेल सँटनर (०) यांना बाद करत सामन्याचे पारडे फिरवले. कॉलिन मुन्रोने ४९ धावांची खेळी केली. न्यूझीलंडचा २५६ धावांतच आटोपला. ऑस्ट्रेलियातर्फे जोश हेझलवूडने ३ तर मिचेल मार्श, पॅट कमिन्स आणि अ‍ॅडम झंपा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ८ बाद ३२४ (स्टीव्हन स्मिथ १६४, ट्रॅव्हिस हेड ५२; ट्रेंट बोल्ट २/५१) विजयी विरुद्ध न्यूझीलंड : ४४.२ षटकांत सर्वबाद २५६ (मार्टिन गप्तील ११४; जोश हेझलवूड ३/४९)

सामनावीर : स्टीव्हन स्मिथ