ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने शुक्रवारी भारतीय गोलंदाजांना आपला जबरदस्त तडाखा दिला. त्यामुळे यजमानांना पाचशेचा टप्पा आरामात गाठता आला. कर्णधारपदाच्या जबाबदारीला स्टिव्हन स्मिथने शानदार शतकानिशी दिमाखात प्रारंभ केला, तर मिचेल जॉन्सन आणि मिचेल स्टार्क यांनी अर्धशतके झळकावत त्याला सुरेख साथ दिली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ९७ धावांची आघाडी घेतल्यानंतर उत्तरार्धात भारताने १ बाद ७१ अशी मजल मारली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर तरी ऑस्ट्रेलियाच्या चेहऱ्यावर स्मित दिसत आहे.
सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा संघ ६ बाद २४७ धावसंख्येवर झगडत असताना भारतीय गोलंदाजांना सामन्यावर नियंत्रण मिळविता आले नाही. स्मिथचे सलग दुसरे कसोटी शतक आणि तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या महत्त्वाच्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५०५ धावा उभारल्या. कर्णधारपदाचे पदार्पण शतकानिशी साजरा करणारा स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा नववा खेळाडू ठरला.
ऑस्ट्रेलियाने ४ बाद २२१ धावसंख्येवरून शुक्रवारी आपला पहिला डाव पुढे सुरू केला. मिचेल मार्शचा (११) इशांत शर्माने त्रिफळा उडवला, तर ब्रॅड हॅडिन (६) वरुण आरोनच्या गोलंदाजीवर शॉर्ट लेगला चेतेश्वर पुजाराकडे झेल देऊन माघारी परतला. त्या वेळी भारताकडे चांगली संधी चालून आली होती, परंतु भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी शरणागती न पत्करता जिद्दीने लढा दिला. अखेरच्या चार विकेटसाठी ऑस्ट्रेलियाकडून २५८ धावांची भर पडली. भारतीय संघ पहिल्या डावात आघाडी घेणार अशी लक्षणे दिसत असताना ऑस्ट्रेलियाने सामन्याला कलाटणी दिली.
स्मिथ आणि जॉन्सन यांनी सातव्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी रचली. इशांत शर्माचे ८८वे शतक महत्त्वपूर्ण ठरले. त्याने आधी जॉन्सनचा अडसर दूर केला. यष्टीपाठी धोनीने त्याचा झेल टिपला. जॉन्सनने ९३ चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकारासह ८८ धावा काढल्या. मग चालू कसोटी मालिकेत स्मिथ प्रथमच बाद झाला. इशांतने त्याचा त्रिफळा भेदला. त्याने १३ चौकार आणि दोन षटकारांनिशी १९१ चेंडूंत १३३ धावांची खेळी साकारली. मग स्टार्कने (५२) नॅथन लिऑनसोबत नवव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचली. अश्विनने स्टार्कचा त्रिफळा उडवून ऑस्ट्रेलियाच्या डावापुढे पूर्णविराम दिला.
तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघ २६ धावांनी पिछाडीवर असून, शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा अनुक्रमे २६ आणि १५ धावांवर खेळत आहेत.

धावफलक
भारत (पहिला डाव) : ४०८.
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ख्रिस रॉजर्स झे. धोनी गो. यादव ५५, डेव्हिड वॉर्नर झे. अश्विन गो. यादव २९, शेन वॉटसन झे. धवन गो. अश्विन २५, स्टीव्ह स्मिथ त्रिफळा गो. इशांत शर्मा १३३, शॉन मार्श झे. अश्विन गो. यादव ३२, मिचेल मार्श त्रिफळा गो. इशांत ११, ब्रॅड हॅडिन झे. पुजारा गो. आरोन ६, मिचेल जॉन्सन झे. धोनी गो. इशांत ८८, मिचेल स्टार्क नाबाद ५२, नॅथन लिऑन झे. अश्विन गो. आरोन २३, जोश हॅझलवूड नाबाद ३२, अवांतर (लेगबाइज ४, वाइड ५, नोबॉल १०) १९, एकूण १०९.४ षटकांत ५०५.
बाद क्रम : १-४७, २-९८, ३-१२१, ४-२०८, ५-२३२, ६-२४७, ७-३९५, ८-३९८, ९-४५४, १०-५०५.
गोलंदाजी : इशांत शर्मा २३-२-११७-३, वरुण आरोन २६-१-१४५-२, उमेश यादव २५-४-१०१-३, आर. अश्विन ३३.४-४-१२८-२, रोहित शर्मा २-०-१०-०.
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय त्रिफळा गो. स्टार्क २७, शिखर धवन खेळत आहे २६, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १५, अवांतर (लेगबाइज २, नोबॉल १) ३, एकूण २३ षटकांत १ बाद ७१
बाद क्रम : १-४१.
गोलंदाजी : मिचेल जॉन्सन ८-३-२९-०, जोश हॅझलवूड ६-०-२४-०, मिचेल स्टार्क ४-१-१०-१, शेन वॉटसन ५-३-६-०.

सकाळच्या सत्रात आम्ही चांगल्या स्थितीत होतो, मात्र उसळत्या चेंडूंचा आम्ही अतिरिक्त उपयोग केला. मिचेल जॉन्सन व मिचेल स्टार्क यांनी सहजतेने धावा केल्या. अपेक्षेपेक्षा आम्ही ५० धावा जास्त दिल्या. तळाच्या फलंदाजांना उसळता चेंडू खेळण्यात अडचणी येतील अशी आमची अपेक्षा होती. मात्र त्यांनी नेटाने खेळ केला. आक्रमकपणा नेहमीच फलदायी ठरत नाही. आमच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाजांना अजूनही साहाय्य करणारी खेळपट्टी आहे.
-उमेश यादव

पहिल्या डावात पाचशेचा टप्पा ओलांडून ९७ धावांची आघाडी मिळवू शकलो, हे महत्त्वाचे आहे. ६ बाद २४० अशी आमची स्थिती होती. त्या स्थितीतून मिचेल जॉन्सन खेळायला आला. त्याने पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजीवर आक्रमण केले. आमच्या तळाच्या फलंदाजांनी उपयुक्त खेळी केल्याने पाचशेचा टप्पा ओलांडू शकलो. शतकासह अन्य खेळाडूंसमोर उदाहरण ठेवू शकलो, याचा आनंद आहे. ऑस्ट्रेलियासाठी झळकावलेले प्रत्येक शतक मोलाचे आहे. वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाच्या विजयात योगदान देऊ शकलो तर ते समाधान देणारे असेल.
– स्टीव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार