ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार ठरेल, असे विधान ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी केले. ऑस्ट्रेलियाने नुकतीच भारतीय संघाविरुद्धची बॉर्डर-गावस्कर मालिका २-१ अशा फरकाने गमावली. पण कर्णधार स्मिथ या मालिकेत दमदार फॉर्मात दिसून आला. स्मिथने चार कसोटी सामन्यांमध्ये ४९९ धावा केल्या. यात तीन खणखणीत शतकांचा समावेश होता. लेहमन यांनी स्मिथच्या फलंदाजीची तुलना माजी क्रीकेटवीर डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली.

 

लेहमन म्हणाले की, स्मिथने भारत दौऱयात खूप चांगली कामगिरी केली. त्याची फलंदाजी डॉन ब्रॅडमन यांच्यासारखी आहे. त्याचे नेतृत्त्व गुण आणि सध्याचा खेळ पाहता तो नक्कीच आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम कर्णधार ठरेल. सध्याचा ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ युवा आहे. त्यामुळे शिकण्यासारखे खूप आहे. भारत दौऱयातून चांगली शिकवण मिळाली आहे. त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल.”

मायकेल क्लार्क, रिकी पॉन्टींग यांच्यापासून ते मार्क टेलर, स्टीव वॉ यांची कर्णधारी कारकिर्द पाहिली तर स्मिथची नेतृत्त्वाची पद्धत खूप वेगळी आहे. संघाचा कर्णधार म्हणून स्मिथ स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करेल, असेही लेहमन म्हणाले.