‘अब आया उंट पहाड़ के नीचे’, असं म्हणतात ना तसंच काहीसं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याचं झालं आहे. कसोटी मालिकेदरम्यान स्मिथने भारतीय खेळाडूंविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती, पण पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱया आयपीएल स्पर्धेत स्मिथला भारतीय खेळाडूंसोबतच खेळावं लागणार आहे. याची जाणीव झाल्याने कसोटी मालिकेदरम्यान झालेले वाद निवळण्यासाठी स्मिथने भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला याला बिअर पिण्याची ऑफर केली.

स्मिथ आणि रहाणे आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळतात. स्मिथने फक्त रहाणेलाच नाही, तर संपूर्ण भारतीय संघाला बीअर पिण्यासाठी निमंत्रण दिले. सामना किंवा मालिका संपली की प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंसोबत बीअर पिण्याचे निमंत्रण देणे ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीत आहे. मालिका गमावल्यानंतर पत्रकार परिषदेत स्मिथने मुरली विजय विरुद्ध निघालेल्या अपशब्दांवरून आपला माफीनामा देखील सादर केला होता. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहली याने पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसोबत पूर्वीसारखे संबंध राहिलेले नाहीत. आता परिस्थिती नक्कीच बदलली आहे. पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंबद्दलचे मत आता खोटे ठरले आहे. ते आता माझे मित्र राहिलेले नाहीत, असे जाहीर विधान केले होते.

 

धरमशालात झालेल्या अखेरच्या कसोटीसाठी भारतीय संघाचे नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे होते. आयपीएलमध्ये रहाणे माझा संघ सहकारी आहे. आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू, असे अजिंक्यला म्हटल्याचे स्मिथने सांगितले. अजिंक्य आणि भारतीय संघाला आपण बिअरचे निमंत्रण दिले होते. त्यावर रहाणेने ”मी तुझ्याशी नंतर बोलेन” अशी प्रतिक्रिया दिली.

येत्या ५ एप्रिलपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरू होणार आहे. त्याआधी स्टीव्ह स्मिथला आपल्या सर्व चुका सुधारण्याची इच्छा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळाडूंमध्ये अनेकदा शाब्दीक युद्ध रंगल्याचे आपण पाहिले. खेळाडूंमध्ये झालेल्या बाचाबाची आणि स्लेजिंगमुळे ही मालिका चर्चेचा विषय ठरली. भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.