भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले असले तरी त्याच्या नेतृत्त्व गुणांची गरज संघाला भासली. नुकतेच मुंबई इंडियन्सविरुद्ध रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात पुण्याचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने धोनीजवळ जाऊन त्याचा सल्ला घेतला. धोनीच्या सल्ल्यानुसार स्मिथने क्षेत्ररक्षण नियोजित केले. पुण्याने हा सामना ३ धावांनी जिंकला.

धोनीने राष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदावून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आयपीएल सुरू होण्यापूर्वी पुण्याच्या संघ व्यवस्थापनाने धोनीला संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर स्मिथने एका सामन्यात धोनी मैदानात असताना कर्णधारी खेळी साकारून संघाला विजय प्राप्त करून दिल्याबद्दल संघ मालकांनी धोनीवर अप्रत्यक्ष टीका देखील केली होती. त्यानंतर वाद देखील निर्माण झाला. पण धोनीने तोंडी उत्तर देण्याऐवजी बॅटने प्रत्युत्तर देणे योग्य समजले आणि पुढच्या सामन्यात धोनीने नाबाद ६१ धावांची मॅच विनिंग खेळी साकारली.

मुंबईविरुद्धच्या वानखेडेवरील सामन्यात अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी १७ धावांची गरज होती. रोहित शर्माने मैदानात जम बसवला होता. अशावेळी कर्णधार स्मिथला धोनीच्या ‘कर्णधारी’ सल्ल्याची गरज वाटली. धोनीने क्षणाचाही विलंब न लावता अखेरच्या षटकासाठी क्षेत्ररक्षणाचा सल्ला स्मिथला दिला. अखेरच्या षटकात पुण्याचा गोलंदाज जयदेव उनाडकट याने तीन विकेट्स घेतल्या आणि पुण्याने हा सामना तीन धावांनी जिंकला.