अतिशय थरारक रंगलेल्या लढतीत अतिरिक्त वेळेतील अखेरच्या मिनिटाला स्टीव्हन गेरार्डने पेनल्टीवर गोल करून लिव्हरपूलला लुडोगोरेट्स संघावर २-१ असा विजय मिळवून दिला. या विजयामुळे लिव्हरपूलने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत ‘ब’ गटात तीन गुणांची कमाई केली. अर्सेनलला मात्र बोरूसिया डॉर्टमंडकडून ०-२ असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. गतविजेत्या रिअल माद्रिदने बसेलचे आव्हान ५-१ असे मोडीत काढले. अ‍ॅटलेटिको माद्रिदने ऑलिम्पियाकोसवर ३-२ असा निसटता विजय मिळवला.
२००९नंतर प्रथमच चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळणाऱ्या लिव्हरपूलला पदार्पणवीर बल्गेरियाच्या लुडोगोरेट्स संघाविरुद्ध विजयाची खात्री होती. मात्र ८० मिनिटापर्यंत दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. अखेर ८२व्या मिनिटाला मारिओ बालोटेल्लीने लिव्हरपूलचे खाते खोलले. पण अतिरिक्त वेळेतील पहिल्या मिनिटाला दानी अबालो याने गोल करत बरोबरी साधली. मात्र गोलक्षेत्रात जावी मँकिलोने केलेल्या चुकीचा फटका लुडोगोरेट्सला बसला. ९३व्या मिनिटाला लिव्हरपूलला पेनल्टी-किक मिळाल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा उठवत गेरार्डने गोल करून लिव्हरपूलला विजय मिळवून दिला.
स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीगमध्ये शानदार सुरुवात केली. मरेक सुची (१४व्या मिनिटाला, स्वयंगोल), गॅरेथ बॅले (३०व्या मिनिटाला), ख्रिस्तियानो रोनाल्डो (३१व्या मिनिटाला), जेम्स रॉड्रिगेझ (३७व्या मिनिटाला) आणि करिम बेंझेमा (७९व्या मिनिटाला) यांनी गोल लगावत रिअल माद्रिदच्या विजयावर मोहोर उमटवली. बसेलकडून एकमेव गोल डेर्लिस गोंझालेझने (३८व्या मिनिटाला) केला.