सिडनीच्या स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या चॅपल-हेडली मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने सर्वांचे मन जिंकले. स्टीव्हन स्मिथनेच स्वबळावर संघाला विजय मिळवून दिला. मॅरेथॉन शतकी खेळी, अफलातून झेल आणि चतुरस्त्र नेतृत्त्व अशा सर्वागीण कौशल्याच्या जोरावर स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. संघ संकटात सापडलेला असताना स्मिथने आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत एकदिवसीय करिअरमधील आपली सर्वाधिक १६४ धावांची वैयक्तिक खेळी साकारली. स्मिथच्या १६४ धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाच्या संघाला न्यूझीलंडसमोर विजसाठी ३२४ धावांचा डोंगर उभारता आला. विशेष म्हणजे, स्मिथने न्यूझीलंडच्या डावात एक अप्रतिम झेल देखील टीपला. स्मिथने टीपलेला हा झेल उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.

न्यूझीलंडच्या डावाच्या २५ वे षटक सुरू होते. न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १४० अशी असताना मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडच्या वॉल्टिंगने पॉईंटच्या दिशेने फटका मारला. वॉल्टिंगने फटका मारताच क्षणार्धात पॉईंटवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या स्टीव्हन स्मिथने हवेत झेप घेऊन एका हातात अप्रतिम झेल टीपला. स्मिथने टीपलेल्या झेलवर सर्वच आवाक झाले. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी स्मिथचे कौतुक केले.
न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टीन गप्तीलने शतकी खेळी साकारली, पण त्याला दुसऱया बाजूने अपेक्षित साथ मिळू शकली नाही.

ऑस्ट्रेलियाच्या ३२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव २५६ धावांत संपुष्टात आला. स्मिथने टीपलेला झेल अव्वल दर्जाचा होता. हवेत झेप घेऊन झेल टीपल्यानंतर तो खाली कोसळला पण चेंडूचा जमिनीला स्पर्श न होऊ देता तो पुन्हा उभा राहिला आणि झेल पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर ६८ धावांनी मात करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. स्टीव्हन स्मिथला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.