सामन्यात अकरा बळी
आफ्रिकेचा पाकिस्तानवर २११ धावांनी विजय
डेल स्टेनने नवीन चेंडूवर पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादाण उडविली, त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेला पहिल्या क्रिकेट कसोटीत सोमवारी २११ धावांनी विजय मिळवता आला आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
विजयासाठी ४८० धावांचे आव्हान मिळालेल्या पाकिस्तानने ४ बाद १८३ धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला, मात्र २६८ धावांमध्ये त्यांचा डाव आटोपला. रविवारी शतकी भागीदारी करणाऱ्या असाद शफीक व मिसबाह उल हक यांना पहिल्या तीन षटकांमध्येच बाद करीत स्टेन याने संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. शफीक व हक यांनी पाचव्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी केली. शफीक याने नऊ चौकारांसह ५६ धावा केल्या. हक याने ११ चौकारांसह ६४ धावा टोलविल्या.
स्टेन याने या सामन्यातील पहिल्या डावात ८ धावांमध्ये ६, तर दुसऱ्या डावात ५२ धावांमध्ये ५ असे एकूण ११ बळी घेतले. आफ्रिकेचा यष्टीरक्षक अब्राहम डी’व्हिलियर्स याने या सामन्यात यष्टीमागे एकूण ११ झेल घेत इंग्लंडच्या जॅक रसेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. रसेल याने १९९५-९६ मध्ये याच मैदानावर आफ्रिकेविरुद्ध अकरा झेल घेतले होते. एकाच सामन्यात शतक आणि यष्टीमागे दहा किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारा पहिला खेळाडू होण्याचा मान त्याने मिळवला. त्याने या सामन्यातील दुसऱ्या डावात नाबाद १०३ धावा केल्या होत्या.
या संघांमधील दुसरा कसोटी सामना केपटाऊन येथे १४ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका २५३ व ३ बाद २७५ घोषित.
पाकिस्तान ४९ व २६८ (नासिर जमशेद ४६, मिसबाह उल हक ६४, असाद शफीक ५६, उमर गुल २३, डेल स्टेन ५/५२, व्हर्नन फिलँडर २/६०, मोर्न मोर्कल २/८९).