ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा क्षेत्राला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या उत्तेजकांचा सर्रास वापर ऑस्ट्रेलियात होत असल्याचे ऑस्ट्रेलियन सरकारने वर्षभर केलेल्या चौकशीतून समोर आले आहे. उत्तेजकांच्या फोफावलेल्या जाळ्यामुळे सामनानिश्चिती किंवा सट्टा लावणे यांसारख्या गुन्ह्यांची व्याप्ती वाढल्याचेही चौकशीअंती समोर आले आहे.
व्यावसायिक क्रीडा क्षेत्रात निषिद्ध असलेली उत्तेजके मोठय़ा प्रमाणावर वापरली गेली आहेत. पेप्टाइड्स, हार्मोन्स आणि बंदी घालण्यात आलेली उत्तेजके सर्रासपणे वापरली गेल्याचे ऑस्ट्रेलियाच्या गुन्हे आयुक्तांच्या चौकशीत आढळले आहे. बंदी घालण्यात आलेली ही उत्तेजके पुरविणारी गुन्हेगारी टोळी मोठय़ा प्रमाणावर सक्रिय असून त्याची परिणती सट्टाबाजार चालवणे आणि सामनानिश्चिती करणे यात झाली असल्याचेही गुन्हे आयुक्तांनी म्हटले आहे. उत्तेजके पुरवण्यात क्रीडाशास्त्रज्ञ, प्रशिक्षक, पदाधिकारी (सपोर्ट स्टाफ) यांच्यासह डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले आहे.
‘‘समोर आलेले सत्य भयानक असून त्यामुळे चाहत्यांच्या मनातून क्रीडापटूंची प्रतिमा मलिन होणार आहे. अनेक क्लबच्या असंख्य अ‍ॅथलीट्सनी ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्याचबरोबर अनेक उत्तेजके घेऊन उत्तेजकविरोधी कायद्याचाही भंग केला आहे. ही फसवणूक असली तरी गुन्हेगारांच्या मदतीनेच हे कृत्य करण्यात आले आहे,’’ असे ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री जेसन क्लेअर यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या उत्तेजकविरोधी संस्थेने (यूएसएडीए) विख्यात सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग विरोधात सादर केलेला अहवाल आणि ऑस्ट्रेलियातील या प्रकरणाचा अहवाल समांतर असा आहे. खेळाडूंनी व्यावसायिक पद्धतीने उत्तेजकांचा वापर केल्याचे दोन्ही अहवालात आढळून आले आहे. युरोप आणि अमेरिकेतील उत्तेजक प्रकरणांसह ऑस्ट्रेलियातही खेळाडूंसह प्रशिक्षक, गुन्हेगारी संघटना तसेच डॉक्टर आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे.
क्रिकेटमध्ये उत्तेजके नाहीत -सदरलँड
क्रीडा क्षेत्राला हादरवणारा सरकारचा अहवाल असला तरी ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये अद्याप उत्तेजकांचा प्रादुर्भाव झाला नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘खेळांविषयीचा अ‍ॅथलीट्सचा दृष्टिकोन बदलण्यासाठी क्रीडा संघटना आणि सरकारने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये उत्तेजकांचा समावेश असल्याचे कोणतेही पुरावे त्यांना सापडले नाहीत. उत्तेजकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच खेळाडूंना उत्तेजकांबाबत सुशिक्षित करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याआधीच कठोर पावले उचलली आहेत.’’