पॉल व्हॅन अ‍ॅस यांच्या हकालपट्टीनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाच्या रिओ ऑलिम्पिक तयारीवर परिणाम होणार असला तरी संघाने सर्व काही गमावलेले नाही. हॉकी इंडियाचा कारभार चालवणाऱ्या संघटकांनी कारण नसताना प्रशिक्षकांची हकालपट्टी करणे थांबवायला हवे, असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज हॉकीपटू रिक चार्ल्सवर्थ यांनी व्यक्त केले.
भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी अ‍ॅस यांना तीन वर्षांकरिता करारबद्ध केले असतानाही केवळ पाच महिन्यांत त्यांची हकालपट्टी करण्यात आली. केवळ हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांच्यासोबत बेल्जियमध्ये झालेल्या वादामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्यावर चार्ल्सवर्थ म्हणाले, ‘‘तुम्ही भाग्यवान आहात, राँलेट ओल्टमन्स अद्यापही भारतात आहेत. ते खेळाडूंना ओळखतात आणि उच्च कामगिरी संचालक म्हणून ते काही वर्षे संघासोबत आहेत. पण, प्रशिक्षक बदलणे आणि हकालपट्टी करणे हे संघासाठी चांगले नाही.’’
भारतात प्रशिक्षकांना काय महत्त्व आहे, याची जाण चार्ल्सवर्थ यांना आहे. हॉकी इंडिया लीगमध्ये ते प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहेत आणि २००८मध्ये दहा महिने त्यांनी भारतीय संघाचे तांत्रिक संचालक म्हणून काम पाहिले आहे. ते म्हणाले की, ‘‘प्रशिक्षणाची जबाबदारी प्रशिक्षकांनाच पार पाडू द्या. त्यांना सर्वाधिकार द्या. त्यानंतर भारतीय हॉकीत चांगल्या गोष्टी घडताना दिसतील, नाहीतर अ‍ॅस यांच्या हकालपट्टीसारखे वृत्त ऐकायला मिळेल.’’
जोस ब्रासा आणि टेरी वॉल्श यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतरही अ‍ॅस यांनी प्रशिक्षकाची जबाबदारी का स्वीकारली, हा प्रश्न चार्ल्सवर्थ यांना सतावत आहे. ‘‘ब्रासांनी चांगले काम केले होते. त्यानंतर मायकेल नोब्स आणि टेरी वॉल्श यांनीही चांगली कामगिरी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ प्रगती करत होता. अशा नकारात्मक गोष्टी आजुबाजूला घडत असताना संघ उभा करणे आव्हानात्मक आहे,’’ असे ते म्हणाले.