तात्पुरत्या निलंबनाची कारवाई; ‘ब’ नमुन्याच्या तपासणीची विनंती

भारतीय फुटबॉल संघाचा गोलरक्षक सुब्राता पॉलवर मंगळवारी उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्या प्रकरणी तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ‘ब’ नमुन्यात स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याची संधी त्याच्याकडे आहे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) सरचिटणीस यांनी ही माहिती दिली. ‘ब’ नमुन्यातही दोषी आढळल्यास पॉलवर चार वर्षांची बंदी घातली जाऊ शकते.

‘‘टेर्बुटलाइन या बंदी घातलेल्या पदार्थाचे अंश पॉलच्या ‘अ’ नमुन्यात आढळल्याचे राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) एआयएफएफला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे त्याच्यावर तात्पुरती बंदीची कारवाई करण्यात आली आहे,’’ असे दास यांनी सांगितले. श्वसनाचा त्रास असलेल्या किंवा दमा असलेल्या व्यक्तींना ‘टेर्बुटलाइन’ दिले जाते.  पॉल आय-लीगमध्ये डीएसके शिवाजियन्स क्लबचे प्रतिनिधित्व करत असून त्यांचा अखेरचा साखळी सामना ३० एप्रिलला मिनव्‍‌र्हा पंजाबविरुद्ध होणार आहे. या लढतीत पॉलला खेळता येणार की नाही, याबाबत विचारले असता दास म्हणाले, ‘ब नमुन्याच्या चाचणीसाठी आणि बंदी उठवण्याबाबत पॉल एकाच वेळी याचिका दाखल करू शकतो. बंदीविरोधात याचिका दाखल केल्यानंतर त्याला खेळता येईल, परंतु नाडाने त्याच्या याचिकेविरोधात निकाल दिला तर नियमानुसार त्याच्या क्लबला पराभूत घोषित करण्यात येईल.’

भारतीय संघाचे शिबीर मुंबईत सुरू असताना पॉलच्या लघवीचे नमुने घेण्यात आले होते. जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेच्या (वाडा) नव्या नियमांनुसार उत्तेजक चाचणीत पहिल्यांदा दोषी आढळणाऱ्या खेळाडूला चार वर्षांची बंदीची शिक्षा होऊ शकते. ३० वर्षीय पॉल याने ‘ब’ नमुन्यांच्या चाचणीची मागणी केली असून आपण त्यात निर्दोष असल्याचे सिद्ध करू असा दावा केला आहे.

तो म्हणाला, ‘उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याच्या वृत्ताने मला धक्का बसला आहे. नाडा किंवा एआयएफएफ यांच्याकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. प्रसारमाध्यमांमार्फत मला हे समजले आहे. दहा वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे आणि मनापासून मी खेळत आलो आहे. मी निर्दोष असल्याचे सिद्ध करेन. त्यामुळे ‘ब’ नमुन्याची चाचणी करण्याची मी विनंती करणार आहे.’