मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचे पडघम एकीकडे वाजत असताना येणाऱ्या क्रिकेट हंगामासाठी मुंबईची निवड समिती आणि प्रशिक्षकांची घोषणा बुधवारी करण्यात आली. मुंबईच्या वरिष्ठ आणि २५-वर्षांखालील संघाच्या निवड समितीचे अध्यक्षस्थान भारताचे माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याचप्रमाणे मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाच्या निवड समितीच्या प्रमुखपदाची धुरा भारताचे माजी यष्टीरक्षक चंद्रकांत पंडित यांच्याकडे देण्यात आली आहे. मुंबईच्या संघाला मागील हंगामात ४०वे रणजीपद जिंकून देणाऱ्या प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्यावरच पुढील मोसमासाठीसुद्धा एमसीएने विश्वास प्रकट केला आहे. २५ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद विनायक सामंत यांच्याकडे, तर १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद विनोद राघवन यांच्याकडे देण्यात आले आहे.
भारताचे माजी सलामीवीर ६७ वर्षीय सुधीर नाईक यांनी वानखेडे स्टेडियमवर अनेक वष्रे क्युरेटर म्हणून काम पाहिले आहे. मुंबईच्या क्रिकेटची त्यांना चांगली माहिती आहे. त्यामुळेच राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर नाईक यांची वर्णी लागली आहे. मुंबईच्या वरिष्ठ आणि २५-वर्षांखालील संघाच्या निवड समितीमध्ये करसन घावरी, दीपक जाधव आणि राजू सुतार या तिघांचा समावेश आहे. विनायक सामंत ७० वर्षीय विलास गोडबोले यांची जागा घेतील. गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या २५-वर्षांखालील संघाने मागील चार वर्षांत तीनदा जेतेपदाचा मान मिळवला आहे.
१९ वर्षांखालील निवड समितीमध्ये पंडित यांच्यासोबत मंदार फडके, अरुण शेट्टी, श्रीधर मंडाले यांचा समावेश आहे. १६ आणि १४ वर्षांखालील संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद अनुक्रमे रवी ठक्कर आणि रमेश वाजगे यांच्याकडे देण्यात आले आहे. याचप्रमाणे महिलांच्या संघाच्या निवड समितीचे प्रमुखपद वृंदा भगत यांच्याकडे तर १९ वर्षांखालील संघाचे प्रमुखपद आरती वैद्य यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.