भारतीय क्रिकेट संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी यजमान मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) मी लिखित स्वरूपात तक्रार दाखल केली आहे. आता त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत मी आहे, असे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर सुधीर नाईक यांनी सांगितले. पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ४३८ धावांचे विक्रमी आव्हान उभे केले आणि त्यानंतर २१४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. फलंदाजांसाठी पर्वणी ठरणारी खेळपट्टी बनवल्यामुळे नाईक यांच्यावर शास्त्री यांनी तोफ डागली. ‘‘मी एमसीएचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर, अध्यक्ष शरद पवार आणि बीसीसीआयचे खेळ विकास महाव्यवस्थापक प्रा. रत्नाकर शेट्टी यांना या घटनेची माहिती दिली आहे. शास्त्री यांच्यासंदर्भात लिखित तक्रार दाखल करण्यास त्यांनी सांगितले होते. त्यानुसार मी प्रक्रिया केली असून, आता एमसीए काय निर्णय घेईल, याची मी वाट पाहत आहे,’’ असे नाईक यांनी सांगितले.