इंग्लंडच्या अ‍ॅलन फोर्सीथच्या गोलमुळे विजयाची हुलकावणी

भारतीय पुरुष हॉकी संघाला सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पध्रेच्या पहिल्या लढतीत इंग्लंडविरुद्ध दोन वेळा आघाडी घेऊनही २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या अ‍ॅलन फोर्सीथने ५२व्या मिनिटाला गोल करून भारताच्या विजयाचा घास हिरावला. तत्पूर्वी, भारताकडून आकाशदीप सिंग (१९ मि.) व मनदीप सिंग (४८ मि.) यांनी, तर इंग्लंडकडून टॉम कार्सन (२५ मि.) यांनी गोल केले.

अखेरच्या मिनिटाला इंग्लंडला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा बचाव करून भारताने पराभव टाळला. व्हिडीओ पंच प्रणालीनंतर इंग्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु इंग्लंडचा कर्णधार फिल रॉपरने चेंडू गोलजाळीपासून दूर टोलवत विजयाची संधी गमावली. उभय संघांमध्ये गतवर्षी लंडन येथे चॅम्पियन्स करंडक स्पध्रेदरम्यान झालेल्या लढतीत भारताने २-१ असा विजय मिळवला होता.

पावसामुळे आणि विजयांच्या कडकडाटांमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सलामीचा सामना नियोजित वेळेनुसार दोन तास उशिराने सुरू झाला. त्यानंतर सुरू झालेल्या सामन्यात नवव्या मिनिटाला इंग्लंडच्या हेन्री वेईरने आक्रमण केले. त्याने रिव्हर्स फटक्याद्वारे गोलजाळीच्या दिशेने टोलवलेला चेंडू गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने अडवला. तीन मिनिटानंतर भाताच्या आकाशदीपने इंग्लंडच्या बचावपटूंना चकवत प्रतिस्पर्धी संघांच्या वर्तुळात आगेकूच केली आणि चेंडू एस. व्ही. सुनीलकडे टोलावला. परंतु इंग्लंडचा गोलरक्षक हॅरी गिब्सनने सुनीलचा प्रयत्न अपयशी ठरवला.

प्रदीप मोरने टोलवलेला चेंडू इंग्लंडच्या बचावपटूच्या पायाला लागल्याने भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर देण्यात आला. कॉर्नरवरून टोलावलेला चेंडू वर्तुळाच्या रेषेवर उभ्या असलेल्या खेळाडूला अडवण्यात अपयश आले, परंतु मनप्रीत सिंगने २५ मीटरवरून तो गोलजाळीच्या दिशेने तटवला. इंग्लंडच्या गोलरक्षकाच्या पॅडला लागून चेंडू गोलजाळीनजीक उभ्या असलेल्या आकाशदीपकडे गेला आणि तयाने ही संधी अचूक हेरून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंकडून आक्रमक खेळ झाला. २५व्या मिनिटाला टॉम कार्सनने भारताच्या बचावपटूंना चकवून बरोबरीचा गोल केला.

त्यानंतर दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ करताना सामन्यातील चुरस कायम ठेवली. ४८व्या मिनिटाला भारताने पुन्हा आघाडी घेतली. सुनीलने चेंडू मनप्रीतकडे टोलावला आणि त्याने तो मनदीप सिंगकडे सरकवला. मनदीपने त्यावर गोल करून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र याही वेळेला इंग्लंडच्या खेळाडूंनी बरोबरी साधण्यात यश मिळवले. ५२व्या मिनिटाला अ‍ॅलनने गोलरक्षक श्रीजेशला चकवत बरोबरीचा गोल केला. उर्वरित खेळात ही बरोबरी कायम राहिली.