डायव्हिंग हा अतिशय विलोभनीय व जागतिक स्तरावर भरपूर पदके मिळविण्याचा क्रीडा प्रकार असला, तरी या खेळात आपल्याकडे अजूनही अपेक्षेइतके लक्ष दिले जात नाही. या खेळाबाबत आपल्या पाल्यांमध्ये असलेले क्रीडा नैपुण्य लक्षात घेऊन त्यांच्या विकासावर भर देण्यासाठी सोलापुरातील काही पालकांनी एकत्र येऊन श्री अ‍ॅक्वेटिक क्लबची स्थापना केली. या क्लबमधील खेळाडूंनी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकांची कमाई करून दिली आहे.

आपल्या देशात बहुंताश ठिकाणी डायव्हिंगसाठी स्वतंत्र तलाव उपलब्ध नाही. जलतरण तलावावर पोहण्याचा सराव संपल्यानंतर डायव्हिंगच्या खेळाडूंना सरावाची संधी मिळते. काही वेळ भर उन्हात त्यांना सराव करावा लागतो. तसेच अनेक ठिकाणी डायव्हिंगसाठी आवश्यक असणारे चांगल्या दर्जाचे बोर्ड नसतात, सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसते. अशा अनेक अडचणींवर मात करीत डायव्हिंगपटू कारकीर्द घडवत असतात. श्री अ‍ॅक्वेटिक क्लबच्या खेळाडूंची काही वेगळी स्थिती नाही. या क्लबच्या खेळाडूंनी अनेक अडचणींवर मात करीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भरपूर पदकांची लयलूट केली आहे. त्यांच्या संघातील यशस्विनी नारायणपेठकर व पूनम शहा यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. १५ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तृष्णा पटेल, जागृती साखरकर, बिल्वा गिराम, ओम अवस्थी, रिया मुस्तारी, संकेत ढोले, निहाल गिराम, वरुण पै आदी खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धामधील पदकांवर आपले नावही कोरले आहे. त्याचप्रमाणे आशियाई वयोगट स्पर्धा, आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरील शालेय व खुल्या क्रीडा स्पर्धामध्ये श्री क्लबच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. सोलापूर येथील डायव्हिंगबाबत असलेल्या मर्यादांमुळे अनेक वेळा हे खेळाडू स्पर्धेच्या ठिकाणी थोडे दिवस अगोदर जाऊन तेथे सराव करतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्याचा फायदा कामगिरी उंचावण्यासाठीही होत असतो.

a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
Samsung company release To Galaxy AI features for flagship devices Check list if your phone is on the list
आनंदाची बातमी! आता सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये येणार AI फीचर्स; पाहा संपूर्ण यादी
Zookeeper takes on lion in epic tug of war
Viral video: प्राणीसंग्रहालयात सिंहाबरोबर रस्सीखेच खेळतोय हा व्यक्ती! कोण जिंकलं ते व्हिडीओमध्ये बघा
when real dog face robo dog watch Funny incident
VIDEO : जेव्हा कुत्र्यासमोर रोबो डॉग आला तेव्हा… व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

डायव्हिंगमध्ये पदक मिळविण्याची क्षमता आपल्या पाल्यांकडे आहे. त्यांना संघटित प्रयत्नांचे पाठबळ मिळाले, प्रायोजक मिळाले तर ही मुले देशाचा नावलौकिक उंचावतील, हे लक्षात आल्यानंतर श्रीकांत शेटे, डॉ. राजन शहा, अनिल सांबरानी, अ‍ॅड. सुधाकर वळेकर आदी पालकांनी १९९७मध्ये श्री अ‍ॅक्वेटिक क्लब स्थापन केला. महानगरपालिकेचा सावरकर तलाव व मरकडेय तलाव या दोन ठिकाणी या क्लबचे खेळाडू सराव करतात. सुरुवातीला सागवानी लाकडी फळीवर त्यांचा सराव असे. कालांतराने ही फळी तुटल्यानंतर फायबरच्या बोर्डवर त्यांचा सराव सुरू झाला. पोहण्याचा सराव संपल्यानंतरच्या वेळेत डायव्हिंगसाठी तलाव उपलब्ध होतो. उन्हाळ्यात पोहण्याच्या शिबिरांना भरपूर प्रतिसाद मिळतो. साहजिकच त्यांच्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतो. त्यामुळे खूप तापलेल्या उन्हातच डायव्हिंगचा सराव करण्याची वेळ डायव्हिंगपटूंवर येते. अर्थात आपल्याला त्यामध्ये करिअर करावयाचे आहे, हे लक्षात घेऊनच हे खेळाडू तो त्रास सहन करीत सरावाला ते प्राधान्य देतात. पहाटे ५ ते ६ व दुपारी ११ ते २ या वेळेत त्यांचा सराव सुरू असतो. डायव्हिंगसाठी पूरक व्यायामाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीबाबतही ते एकाग्रतेने लक्ष देतात. राज्य, राष्ट्रीय आदी विविध स्तरावरील स्पर्धामध्ये भाग घेताना या खेळाडूंच्या पोशाख व अन्य कीट्सचा खर्च त्यांच्या पालकांनाच करावा लागतो. हे खेळाडू आपला शैक्षणिक अभ्यासक्रम सांभाळूनच डायव्िंहगचा सराव करीत आहेत. या खेळाडूंना तेथील महानगरपालिका व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांचे खूप सहकार्य लाभले आहे. डायव्हिंगसाठी आवश्यक असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बोर्ड्सची सुविधा उपलब्ध झाली, तर हे खेळाडू ऑलिम्पिकमध्येही चमक दाखवू शकतील.

डायव्हिंग हा अवघड क्रीडा प्रकार असला, तरी त्याबाबत सोलापुरात भरपूर लोकप्रियता आहे. तेथील खेळाडूंचा सराव पाहण्यास प्रेक्षकांची गर्दी असते. या खेळाडूंपैकी बरेचसे खेळाडू कामगार कुटुंबीयांमधील असल्यामुळे सर्वाच्या आर्थिक मर्यादा असतात. तरीही अनेक पालकांनी या खेळाडूंना किमान चांगल्या प्राथमिक सुविधा मिळविण्याबाबत अनेक गोष्टींबाबत त्याग केला आहे. या खेळाडूंमधूनच ऑलिम्पिकपटू निर्माण होईल अशी त्यांना दुर्दम्य आशा आहे. शासनाप्रमाणेच उद्योजकांचे या खेळाडूंना सहकार्य लाभले, तर कदाचित ऑलिम्पिक पदकावरही येथील खेळाडू नाव कोरण्याची शक्यता नाकारता येत नाही.