सदरलँड संघाने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेत आर्सेनल संघाला गोलशून्य बरोबरीत रोखून हद्दपार होण्याची नामुष्की टाळली. आर्सेनलने बरोबरीनंतरही आपले तिसरे स्थान अबाधित राखले आहे.
इमिरेट स्टेडियमवर झालेल्या लढतीत दोन्ही संघाकडून तोडीस तोड कामगिरी झाली. पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या आर्सेनलला दुसऱ्या सत्रात पाहुण्या सदरलँडकडून सडेतोड उत्तर मिळाले. मध्यरक्षक ली कॅटरमोले आणि मध्य बचावपटू सेबॅस्टियन कोएट्स आणि जॉन ओ’शीआ यांनी आर्सेनलवर हल्लाबोल केला आणि त्यांची बचावफळी भेदण्याचा अखेपर्यंत प्रयत्न केला. यात मात्र गोलरक्षक कोस्टेल पॅन्टिलिमॉन याच्याकडून थोडासा संथ खेळ झाला. या बरोबरीमुळे सदरलँडने तळाच्या तीन संघाहून ४ गुणांची आघाडी घेत पुढील सत्रात आपले स्थान पक्के केले आहे.
आर्सेनलचा संघ सर्वोत्तम होता, परंतु आमच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ केला. या सामन्यात अधिक भावना गुंतल्या होत्या. हा अविश्वसनीय क्षण आहे.
डिक अ‍ॅडव्होकॅट (सदरलॅण्डचे प्रशिक्षक)