मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे सन्मान

मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ११ डिसेंबरला क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे होणाऱ्या सोहळ्यात गावस्कर यांना गौरवण्यात येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीदरम्यान हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे २०१३ मध्ये पहिल्यांदा जीवनगौरव पुरस्कार बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना प्रदान करण्यात आला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा १०,००० धावांची वेस ओलांडण्याचा मान गावस्कर यांच्या नावावर आहे. भारताला एकदिवसीय प्रकारात पहिलेवहिले विश्वचषक विजेतेपद मिळवून देणाऱ्या संघाचा गावस्कर अविभाज्य घटक होते. १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेत्या संघाचे गावस्कर कर्णधार होते.

गावस्कर यांनी १२५ कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करताना १०,१२२ धावा केल्या. गौरवशाली कारकीर्दीत त्यांच्या नावावर ३४ शतके आहेत. एकदिवसीय प्रकारात त्यांनी १०८ सामन्यांत ३००० हून अधिक धावा केल्या. निवृत्ती स्वीकारल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) तांत्रिक समितीचे अध्यक्ष होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सुधारणा समितीचे ते अध्यक्ष होते. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही भूमिका सांभाळली. २०१४ मध्ये इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेदरम्यान बीसीसीआयचे प्रमुखपद सांभाळले होते.