आघाडी फळीतील हुकमी खेळाडू एस. व्ही. सुनील व युवराज वाल्मीकी यांचे आगामी जागतिक हॉकी लीगसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. अठरा खेळाडूंच्या भारतीय संघाची निवड येथे बुधवारी जाहीर करण्यात आली. १० जानेवारीपासून या स्पर्धेला येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सुरुवात होणार आहे.
युवराजने २०१२ मध्ये चॅम्पियन्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर दुखापतीमुळे तो बराच काळ स्पर्धात्मक हॉकीपासून दूर होता. सुनील व युवराज या अनुभवी खेळाडूंबरोबरच गोलरक्षक हरज्योतसिंग, मध्यरक्षक एम.बी.अय्यप्पा, आघाडी फळीतील खेळाडू अफान युसूफ या नव्या चेहऱ्यांनाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. हरज्योतने डिसेंबरमध्ये झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याला वरिष्ठ संघात पी. टी. राव याच्याऐवजी संधी मिळाली आहे. त्याने सुलतान जोहार चषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघात उपकर्णधार म्हणून काम केले होते.
भारतीय संघाचे नेतृत्व सरदारासिंग याच्याकडेच ठेवण्यात आले आहे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशकडे सोपविण्यात आली आहे.
भारतीय संघ : गोलरक्षक-पी. आर. श्रीजेश (उपकर्णधार), हरज्योतसिंग. बचावरक्षक-बीरेंद्र लाक्रा, रुपिंदरपालसिंग, व्ही. आर. रघुनाथ, कोठाजितसिंग, अमित रोहिदास. मध्यरक्षक-सरदारासिंग (कर्णधार), एस. के. उथप्पा, धरमवीरसिंग, मनप्रीतसिंग, चिंगलेनासाना सिंग, एम. बी. अय्यप्पा. आघाडी फळी-निक्किन थिमय्या, एस. व्ही. सुनील, मनदीपसिंग, अफान युसूफ, युवराज वाल्मीकी.