आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधवने ‘मुंबई श्री’ अतुल आंब्रेचे आव्हान मोडून काढत चार वर्षांत तिसऱ्यांदा ‘मुंबई महापौर श्री’ स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. २०१४ साली सुनीतने ‘मुंबई महापौर श्री’चा किताब पटकावला होता आणि २०१५ साली त्याने विश्रांती घेत २०१६ मध्ये पुन्हा बाजी मारली.

शिवबा प्रतिष्ठान, बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेच्या सहकार्याने या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. ५५ किलो वजनी गटात अनुभवी संदेश सकपाळने नितीन शिगवणची कडवी झुंज मोडीत काढून गटविजेतेपद संपादन केले. मि. वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या नितीन म्हात्रेला ६० किलो वजनी गटात उमेश गुप्ता आणि विराज लाड यांनी कडवे आव्हान दिले. ६५ किलो वजनी गटात बप्पन दाससमोर प्रमोद झोरे थोडा कमी पडला. मात्र ७० किलो वजनी गटात विलास घडवले आणि संतोष भरणकर यांच्यात अटीतटीचा सामना झाला आणि त्यात विलासने बाजी मारली. ७५ आणि ८० किलो वजनी गटात अनुक्रमे प्रतीक पांचाळ आणि सुशील मुरकरने बाजी मारली.

गटवार निकाल

५५ किलो वजनी गट : १. संदेश सकपाळ, २. नितीन शिगवण, ३. जितेंद्र पाटील; ६० किलो वजनी गट : १. नितीन म्हात्रे, २. उमेश गुप्ता, ३. विराज लाड; ६५ किलो वजनी गट : १. बप्पन दास, २. प्रदीप झोरे, ३. उमेश पांचाळ; ७० किलो वजनी गट : १. विलास घडवले, २. संतोष भरणकर, ३. विशाल धावडे; ७५ किलो वजनी गट : १. प्रतीक पांचाळ, २. लीलाधर म्हात्रे, ३. राहुल तर्फे; ८० किलो वजनी गट : १. सुशील मुरकर, २.अभिषेक खेडेकर, ३. गोपाळ फौजदार; ८० किलोवरील : १. सुनीत जाधव, २. अतुल आंब्रे, ३. सत्यजीत प्रतिहारी; सर्वोत्तम शरीर प्रदर्शक : अभिषेक खेडेकर.