बॉलीवूडमध्ये मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या ‘बेबी डॉल’ सनी लिओनीने तिच्या आवडत्या क्रिकेटपटूची माहिती दिली. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असताना एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सनीने तिच्या आवडत्या क्रिकेटपटूचे नाव सांगितले. क्रिकेटविश्वात यशाचे शिखर गाठलेला सचिन किंवा सध्याचा युवा कर्णधार विराट कोहली सनीचा आवडता क्रिकेटपटू असेल, असा विचार तुम्ही करत असला तर थांबा. या दोघांऐवजी भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सनी लिओनीचा आवडता क्रिकेटपटू आहे.

देशासाठी आयसीसीच्या तीन मुख्य स्पर्धांचे जेतेपद प्राप्त करून देणारा धोनी सध्या आयपीएलमधील निराशाजनक कामगिरीमुळे टीकेचे केंद्रस्थान होत असला तरी त्याच्या क्षमतेवर केव्हाच प्रश्नचिन्ह उभे केले जाऊ शकत नाही. आयपीएलमधील पहिल्या चार सामन्यांत धोनीला केवळ ३३ धावा करता आल्या. तर दुसऱ्या बाजूला संजू सॅमसन, ऋषभ पंत हे युवा क्रिकेटपटू सध्या दमदार फॉर्मात आहेत.

टीकाकारांना नेहमी आपल्या बॅटने प्रत्युत्तर देणाऱ्या धोनीने याही वेळेस हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तुफान खेळी साकारून सर्वांचे तोंड बंद केले. धोनीने ३४ चेंडूत ६१ धावांची खेळी साकारून संघाला विजय प्राप्त करून दिला. संकटांवर नेहमी मात करून पुन्हा उभे राहणाऱ्या या हरहुन्नरी क्रिकेटपटूचे सनीने लिओनीनेही कौतुक केले.

सनी तुझा आवडता क्रिकेट संघ आणि खेळाडू कोणता? असा सवाल एका चाहत्याने सनी लिओनीला विचारला होता. सनीने क्षणाचाही विलंब न लावता ”जाहीरपणे भारतीय क्रिकेट संघ माझा आवडता संघ असून धोनी हा माझा आवडता खेळाडू आहे यात काहीच शंका नाही.”, असे सनी म्हणाली.