सनरायझर्स हैदराबादची विजयी घोडदौड रायझिंग पुणे सुपरजायंट्सने रोखली. यातून सावरत पुन्हा आत्मविश्वासाने कामगिरी करण्यासाठी उत्सुक असलेल्या हैदराबादची शनिवारी यंदाच्या आयपीएलमध्ये झगडणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी गाठ पडणार आहे. या दोन संघांमधील मागील लढत बंगळुरूने जिंकली होती.

हैदराबादच्या खात्यावर सहा सामन्यांतून ६ गुण जमा आहेत. तीन विजय आणि तीन पराजय ही त्यांची कामगिरी. पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून हार पत्करल्यानंतर हैदराबादचा संघ सावरला आणि त्यांनी मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्याविरुद्ध दमदार विजय मिळवले. मात्र त्यांची ही विजयी वाटचाल पुण्याने रोखली. सलामीवीर शिखर धवनचा अपवाद वगळता हैदराबादची फलंदाजीची फळी त्या सामन्यात कोसळली होती. मात्र पुण्याविरुद्ध त्यांना जेमतेम ८ बाद ११८ इतकीची धावसंख्या उभारता आली होती. कर्णधार डेव्हिडन वॉर्नरला भोपळाही फोडता आला नव्हता. आदित्य तरे, ईऑन मॉर्गन, दीपक हुडा आणि मोझेस हेन्रिक्स यांची कामगिरीसुद्धा खराब झाली होती. मात्र गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ८ चेंडूंत २१ धावा केल्या होत्या.

दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज आशीष नेहरा संघात परतला आहे. ट्रेंट बोल्ट आणि केन विल्यमसन यांचा वापर अजून झाला नसला तरी भुवनेश्वर, मुस्तफिझूर रेहमान, बिपुल शर्मा आणि अष्टपैलू मोझेस हेन्रिक्स यांच्यावर हैदराबादच्या गोलंदाजीची मदार आहे.

दुसरीकडेन एकापेक्षा एक सरस फलंदाजांचा फौजफाटा असूनही बंगळुरूला पाच सामन्यांत दोन विजयांसह फक्त ४ गुण कमवता आले आहे. ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत बंगळुरूची फलंदाजी थोडी कमकुवत असली तरी कर्णधार विराट कोहली आणि ए बी डी’व्हिलियर्स यांच्या सातत्यपूर्ण फलंदाजीवर बंगळुरूची जबाबदारी आहे. शेन वॉटसन अष्टपैलूत्वाची झलक देत आहे. युवा सर्फराझ खान आत्मविश्वासाने खेळत आहे. मात्र गोलंदाजी ही बंगळुरूची प्रमुख त्रुटी आहे. युझवेंद्र चहल, केन रिचर्डसन, इक्बाल अब्दुल्ला आणि वॉटसन यांच्या कामगिरीत सुधारणा होईल अशी बंगळुरूची अपेक्षा आहे.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.
  • थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स/एचडी, सोनी सिक्स/एचडी.