गेल्या काही दिवसांत महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवरून धोनीचे टीकाकार आणि त्याच्या समर्थकांमध्ये वाकयुद्ध रंगलेले आहे. काही दिवसांपूर्वी धोनीने आयपीएलमधील हैदराबाद सनरायजर्सविरुद्धच्या सामन्यात तडाखेबंद खेळी साकारून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर बॉलीवूड कलाकार सुशांत सिंग राजपूत याने धोनीवर टीकात्मक भाष्य करणारा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले आहे. ट्वेन्टी-२० प्रकारातील खेळाडू म्हणून महेंद्रसिंग धोनीची उपयुक्तता संपल्याचे गांगुलीने म्हटले होते. धोनी ट्वेन्टी-२० साठी योग्य खेळाडू आहे याबाबत मला साशंकता आहे. एकदिवसीय प्रकारात तो उत्तम खेळाडू आहे. मात्र, जेव्हा ट्वेन्टी-२० चा विचार करायचा झाल्यास त्याने गेल्या दहा वर्षात केवळ एक अर्धशतक केले आहे. ही निश्चितच चांगली कामगिरी नाही, असे गांगुलीने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. मात्र, त्यानंतर धोनीने हैदराबाद सनरायजर्सविरुद्धच्या सामन्यात मॅचविनिंग खेळी साकारून टीकाकारांना गप्प केले होते. हाच धागा पकडत सुशांत सिंग राजपूत याने ‘धोनी तुम्ही म्हणाला होतात तसा नाही’, असा खोचक टोला लगावला आहे. धोनीवर टीका करणारे तज्ज्ञ आता कुठे गेले? , याचे मला आश्चर्य वाटते. धोनी आम्हाला तुझा अभिमान आहे, असे सुशांतने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यापूर्वीही सुशांतने धोनीच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. धोनीवर प्रत्येकवेळी कठोरपणे टीका केली जाते.  मात्र, त्यासाठी त्याचा दर्जा आणि त्याने स्वत:च्या खेळाने निर्माण केलेले मापदंड कारणीभूत आहेत. हा फक्त वेळेचा मुद्दा असून धोनी त्याच्या बॅटने प्रत्युत्तर देईल, असे सुशांतने म्हटले होते.