सुशील कुमार, अमित कुमार आणि विनेश कुमारी या तीन कुस्तीगिरांनी सुवर्णपदकांना गवसणी घालत राष्ट्रकुल स्पर्धेतला सहावा दिवस ‘सुवर्णदिन’ केला. पदकतालिकेत सुवर्णपदकाच्या रकान्यात पिछाडीवर पडलेल्या भारताला पुन्हा अव्वल पाचमध्ये आणण्याचे शिवधनुष्यही त्यांनी पेलले. कुस्तीला ‘अच्छे दिन आये है’ याची प्रचिती कुस्तीगिरांनी दिली. नेमबाजपटू हरप्रीत सिंग, मानवजीत सिंग संधू, संजीव राजपूत यांनी रौप्य तर लज्जा गोस्वामी, गगन नारंग यांनी कांस्यपदकाची कमाई करत पदक परंपरा कायम राखली. ऑलिम्पिक पदक प्राप्त विजय कुमारचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. आठ पदके खात्यात जमा झाल्याने भारतासाठी सहावा दिवस घसघशीत यशाचा ठरला.
भारतासाठी हुकमी क्रीडा प्रकार असलेल्या कुस्तीत भारताने सलग तीन सुवर्णपदके जिंकून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सोनेरी हॅट्ट्रिक केली. पुरुष गटात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सुशीलकुमार (७४ किलो) व अमितकुमार (५७ किलो) तर महिलांमध्ये विनेश फोगाट (४८ किलो) यांनी अजिंक्यपद पटकाविले.
फोटो गॅलरी- सुवर्ण कुस्तीदिन
लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये पदकांची कमाई करणारा सुशीलकुमार हा प्रथमच ७४ किलो गटात उतरला होता. तथापि त्याने अंतिम फेरीत पाकिस्तानच्या कमार अब्बास याला चीतपट करीत शानदार विजय मिळविला. या लढतीमधील पहिल्या फेरीतच त्याने निर्णायक बाजी मारली. त्याने सुरुवातीलाच पट काढून चार गुणांची कमाई केली. पाठोपाठ त्याने आणखी दोन गुण मिळविले. ही फेरी संपत असताना अब्बासने पट काढून दोन गुण मिळविले मात्र त्याचा हा डाव अंगलट आला. कारण त्याची बाजी सुशीलने उलटवित क्षणाचाही विलंब न लावता मोळी डावावर त्याला चीत केले. सुशील याने २००८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक तर २०१२ मध्ये ऑलिम्पिकचे रौप्यपदक मिळविले होते.
सुशीलबरोबर सराव करणाऱ्या अमितकुमार याने ५७ किलो गटात सुवर्णपदकाचे स्वप्न साकार केले. त्याने अंतिम लढतीत नायजेरियाच्या एबिक्वेमिनोमो वेल्सन याचा ६-२ अशा फरकाने पराभव केला. पहिल्या फेरीत त्याने ४-० अशी आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्याच्यासाठी निर्णायक ठरली. अमितने २०१३ मध्ये जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते.
महिलांमध्ये भारताच्या विनेश फोगाट हिने अंतिम लढतीत इंग्लंडच्या याना रॅटीगन हिच्यावर ११-८ अशी मात केली. पहिल्या फेरीत तिने ६-४ अशा गुणांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत तिने पाच गुणांची कमाई केली तर याना हिला चार गुण मिळाले. केवळ एक गुणाच्या फरकाने ही फेरी जिंकून विनेशने सोनेरी कामगिरी केली. या स्पर्धेत तिचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.
जावई माझा भला !
सुशीलकुमारची कुस्ती पाहण्यासाठी त्याचे सासरे व ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक सतपाल हे उपस्थित होते. त्याने सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्यांनी उभे राहून टाळ्या वाजवित त्याचे अभिनंदन केले. ते नवी दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियम येथे मार्गदर्शन करतात. त्यांच्या अकादमीत सराव करणाऱ्या अमितकुमारनेही सोनेरी कामगिरी केली.
नेमबाजी
हरप्रीतसिंगला रौप्यपदक
भारताच्या हरप्रीतसिंगने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल या प्रकारात रुपेरी कामगिरी केली. या प्रकारात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता विजयकुमार याला प्राथमिक फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भारताची मदार सर्वस्वी हरयाणाच्या ३३ वर्षीय हरप्रीतवर होती. प्राथमिक फेरीत तो पहिल्या क्रमांकावर होता तर विजयकुमार हा सातव्या क्रमांकावर होता. पहिले सहाच खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यामुळे विजयची निराशा झाली. हरप्रीत याने २१वेळा अचूक नेम साधला तर ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड चॅपमन याने २३ वेळा अचूक नेम साधला. त्यामुळे हरप्रीतला रौप्य तर डेव्हिडला सुवर्णपदक बहाल करण्यात आले. कॅनडाच्या मेटोडी इगोरोव्ह याला कांस्यपदक मिळाले. हरप्रीत याने २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल एकेरी व दुहेरी अशा दोन्ही विभागांत सोनेरी कामगिरी केली होती.
संजीव राजपूतला रौप्य तर गगनला कांस्य
भारताचा नावाजलेला नेमबाजपटू गगन नारंगला पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातले सुवर्णपदक कायम राखता आले नाही. त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. संजीव राजपूतने रौप्यपदकाची कमाई केली. गगनने ४२३.३, तर संजीवने ४३६.८ गुण पटकावले. इंग्लंडच्या डॅनियल रिव्हर्सने सुवर्णपदकावर नाव कोरले. नारंगने याच प्रकारात खेळताना २००६ आणि २०१० राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरी आणि दुहेरी प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती. या राष्ट्रकुल स्पर्धेत मात्र सुवर्णपदकाने त्याला हुलकावणी दिली आहे.
लज्जा गोस्वामीला कांस्य
गुजरातच्या लज्जा गोस्वामीने महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ४३६.१ गुणांसह कांस्यपदकावर नाव कोरले.
विजयकुमार अपयशी
लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई करणारा भारताचा नेमबाज विजयकुमारला राष्ट्रकुल स्पर्धेतील पात्रता फेरीतच अपयशाला सामोरे जावे लागले. २५ मी. रॅपिड फायर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता फेरीमध्ये विजयकुमारला ५५५ गुण कमावता आले आणि त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
मानवजीत सिंग  संधूला कांस्य
नेमबाजपटू मानवजीत सिंग संधूने पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. १५ पैकी १४ लक्ष्ये भेदत मानवजीतने उपांत्य फेरीत तिसरे स्थान पटकावले. कांस्यपदकासाठीच्या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या मायकेल डायमंडवर मात केली. या प्रकारातील अन्य भारतीय नेमबाजपटू मनशेर सिंगला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. कांस्यपदकासाठीच्या सामन्यात मानवजीत आणि डायमंड दोघांनीही १५ पैकी ११ लक्ष्यांचा अचूक वेध घेतला. शूट ऑफद्वारे झालेल्या निकालात मानवजीतने बाजी मारली.
वेटलिफ्टिंग
भारताला रौप्य व कांस्यपदक
नायजेरियाची महिला वेटलिफ्टर चिका अमालाहा उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे ५३ किलो गटातील सुवर्णपदक तिला गमवावे लागणार असून याचा लाभ भारतीय खेळाडूंना झाला आहे. कांस्यपदक मिळविणारी मात्सा संतोषीला रौप्यपदकावर बढती मिळणार आहे, तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या स्वाती सिंगला कांस्यपदक मिळेल. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माईक हूपर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, उत्तेजकच्या पहिल्या चाचणीत चिका ही दोषी आढळल्यामुळे तिचे सुवर्णपदक काढून घेण्याचा निर्णय झाला आहे. दुसऱ्या चाचणीचा अहवाल आल्यानंतर या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाईल.
विकास ठाकूरला रौप्यपदक
दुखापतीमुळे वेदनांनी त्रस्त असतानाही वेटलिफ्टर विकास ठाकूरने रौप्यपदकाची कमाई केली. ८५ किलो वजनी गटातून खेळताना त्याने पदकावर नाव कोरले. विकासच्या यशाने राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगपटूंची यशस्वी आगेकूच कायम राहिली. ठाकूरने एकूण ३३३ किलो (१५०+१८३) वजन उचलले. न्यूझीलंडच्या रिचर्ड पॅटरसनने ३३५ किलो वजन उचलत सुवर्णपदकावर कब्जा केला. कॅनडाच्या पास्कल प्लामोन्डनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. विकासने पहिल्या प्रयत्नात १४२ किलो वजन उचलले आणि त्यानंतरच्या प्रयत्नांमध्ये १४७ आणि १५० किलो वजनाची नोंद केली. शेवटच्या काही क्षणांमध्ये मुकाबला चुरशीचा झाला. पॅटरसनच्या क्लीन अँड जर्क प्रकारातील १८४ किलो वजनाचा प्रयत्न अवैध असल्याचे पंचांनी जाहीर केले. मात्र पुढच्या प्रयत्नांत त्याने आपला खेळ उंचावत सुवर्णपदकाची कमाई केली.
हॉकी
महिला : भारताकडून त्रिनिदादचा धुव्वा
भारतीय महिला हॉकी संघाने त्रिनिदाद अँड टोबॅगो संघाचा १४-० असा धुव्वा उडवला. अगदीच एकतर्फी लढतीत भारतीय संघाने पहिल्या सत्रात नऊ, तर दुसऱ्या सत्रात पाच गोल केले. दीपिका ठाकूर आणि राणी रामपॉल आणि जसप्रीत कौर यांनी प्रत्येकी ३ गोल केले. वंदना कटारिया, रितू राणी, अनुराधा थोकचोम आणि रितुशा आर्या यांनी प्रत्येकी एक गोल केला.
पुरुष : ऑस्ट्रेलियाची भारतावर मात
पुरुषांच्या हॉकीत अपेक्षेपेक्षा भारताने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघास चिवट लढत दिली, मात्र गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने हा सामना ४-२ अशा फरकाने जिंकून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.