ऑस्ट्रेलिया येथे ३० मे पासून सुरू होणाऱ्या चार देशांच्या हॉकी मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या १७ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व बचावपटू सुशीला चानू पुख्रमबाम हिच्याकडे सोपविण्यात आले आहे. रिओ ऑलिम्पिक स्पध्रेच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या या स्पध्रेत भारतासह जपान (१०),ऑस्ट्रेलिया (३) आणि न्यूझीलंड (४) या जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये असलेल्या संघांचा समावेश आहे.

या मालिकेसाठी रितू राणीला विश्रांती देण्यात आल्यामुळे सुशीलाची निवड करण्यात आली आहे, तर उपकर्णधारपदी दीपिका कायम आहे. या संघात पूनम राणी आणि वंदना कटारिया या अनुभवी खेळाडूंसह निक्की प्रधान व प्रीती दुबे या युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ‘या मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्ती होणे, ही सन्मानजनक बाब आहे. हॉक बे चषक स्पध्रेत आम्ही जपान आणि न्यूझीलंड संघाचा सामना केला आहे. जपान आणि ऑस्ट्रेलिया या संघाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आमचे प्रमुख लक्ष्य आहे. ऑलिम्पिक स्पध्रेत हे संघ एकाच गटात असल्याने त्यांच्या कामगिरीचे विश्लेषणही आम्हाला करता येणार आहे,’ असे मत सुशीलाने व्यक्त केले.

या मालिकेबाबत प्रमुख प्रशिक्षक नील हॅवगुड म्हणाले की, ‘या स्पध्रेत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. जगातील तीन प्रमुख संघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळत आहे आणि रिओ ऑलिम्पिकच्या तयारीसाठी हा अनुभव अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यापैकी जपान आणि ऑस्ट्रेलिया हे संघ ऑलिम्पिकमध्ये एकाच गटात आहेत. त्यामुळे आमची तयारीही उत्तम होणार आहे.’