जलतरणासाठी मुंबईसह महाराष्ट्रात पुरेसे तरणतलाव उपलब्ध आहेत का, हा मुद्दा खेळाच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरतो. सरकारच्या प्रयत्नांमुळे जिल्हा आणि तालुका स्तरावर तरणतलावांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र शहरांमध्ये राहण्यासाठीच जागेची प्रचंड टंचाई असल्याने तरणतलावांना प्राधान्य मिळत नाही. याप्रमाणे मर्यादित सरकारी तरणतलाव आणि खासगी क्लब्सच्या मालकीचे उदंड तरणतलाव या तफावतीमुळे जलतरण हा श्रीमंतांनाच परवडणारा खेळ झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मुंबईसारख्या शहरात ऑलिम्पिक आकाराचे तरणतलाव मोजक्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र यापैकी काही बंद झाले आहेत. सरकारी तरणतलावांमध्ये सर्वसामान्यांना परवडू शकेल अशा शुल्कात पोहण्याची व्यवस्था उपलब्ध होते. मात्र मर्यादित तरणतलाव आणि जलतरणपटूंची प्रचंड संख्या यांचे समीकरण जुळणे कठीण असते. शाळा-महाविद्यालयीन स्तरावरील जलतरणपटूंना अभ्यासाचे वेळापत्रकही जपायचे असते आणि तरणतलाव वापरण्याच्या वेळाही विशिष्ट असतात. अशा परिस्थितीत अनेक जण खासगी तरणतलावांचा पर्याय स्वीकारताना दिसतात. पण खासगी तरणतलावात सूर मारण्यापूर्वी त्या जिमखान्याचे सदस्यत्व घेणे आवश्यक असते आणि हे सदस्यत्व सर्वानाच परवडणारे नसते. सधन पालकवर्ग आपल्या मुलांना या तरणतलावाची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात. मात्र आर्थिकदृष्टय़ा मागास पालकांना आपल्या मुलाची आवड जोपासता येत नाही.
‘‘जलतरण क्षेत्रात खूप मोठी गुणवत्ता आहे. अनेक मुले-मुली दमदार कामगिरी करीत आहेत. मात्र तरणतलावांच्या कमतरतेमुळे आपण पिछाडीवर पडत आहोत,’’ असे महात्मा गांधी तरणतलाव केंद्रातील प्रशिक्षक आनंद सारंग यांनी सांगितले.
महानगरपालिका अखत्यारितील जलतरण तलाव
*  महात्मा गांधी स्मृती ऑलिम्पिक तरणतलाव, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर,
*  सरदार वल्लभभाई पटेल तरणतलाव, महात्मा गांधी रोड, कांदिवली (पश्चिम)
*  घाटकोपर लॉयन्स म्युनिसिपल तरणतलाव, घाटकोपर (पश्चिम)
*  निरलॉन ऑलिम्पिक म्युनिसपल तरणतलाव, सिद्धार्थनगर, गोरेगाव (पश्चिम)
*  जनरल अरुणकुमार वैद्य तरणतलाव, शरदभाऊ आचार्य मार्ग, नटराज सिनेमागृहाजवळ, चेंबूर
*  प्रियदर्शनी स्पोर्ट्स संकुल तरणतलाव, मुलुंड (पश्चिम)
*  शहाजीराजे क्रीडा संकुल तरणतलाव, अंधेरी (पश्चिम)