बांगलादेशमध्ये होणारी आशिया चषक स्पर्धा आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. महेंद्रसिंह धोनी दोन्ही स्पर्धांसाठी भारतीय संघाचा कर्णधार राहणार असून, संघामध्ये रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, पवन नेगी, मोहम्मद शमी या १५ जणांचा समावेश आहे.
८ मार्च ते ३ एप्रिल या २७ दिवसांच्या कालावधीत भारतातील बंगळुरू, चेन्नई, धरमशाला, कोलकाता, मोहाली, मुंबई, नागपूर आणि नवी दिल्ली अशा आठ शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत एकूण ५८ सामने होणार असून, यात पुरुषांचे ३५ आणि महिलांचे २३ सामने असतील. नवी दिल्ली आणि मुंबईला अनुक्रमे ३० आणि ३१ मार्चला उपांत्य फेरीचे सामने होतील, तर कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर ३ एप्रिलला अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे.
संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये झाली. या बैठकीला कर्णधार महेंद्रसिंह धोनी, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर उपस्थित होते. अनुराग ठाकूर यांनीच पत्रकार परिषदेत भारतीय संघाची घोषणा केली.