पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज शाहिद आफ्रिदीने ‘नेटवेस्ट टी-२० ब्लास्ट’मध्ये टी-२०तील आपले पहिले शतक साजरे केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती घेतल्यानंतर देखील स्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता असल्याचे त्याने डर्बीशायर विरुद्ध खेळलेल्या सामन्यात दाखवून दिले. हॅम्पशायर संघाकडून खेळणाऱ्या आफ्रिदीने अवघ्या ४३ चेंडूत १०१ धावांची धमाकेदार खेळी केली. यात १० चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. २५६ सामने खेळणाऱ्या आफ्रिदीचे टी-२० तील हे पहिले शतक आहे.

या सामन्यात डर्बीशायर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हॅम्पशायर संघाकडून आफ्रिदीने डावाला सुरुवात केली. सलामीला आलेल्या आफ्रिदीने प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यष्टीरक्षक आणि सलामीवीर केलविन डिकिन्सन संघाची धावसंख्या ४३ असताना तंबूत परतला. त्याने केवळ १८ धावांचे योगदान दिले. पहिला धक्का बसल्यानंतर कोणताही दबाव न घेता आफ्रिदीने त्याचा नैसर्गिक खेळ दाखवला. हॅम्पशायरचा कर्णधार जेम्ससोबत त्याने ९७ धावांची भागीदारी केली. त्याने मैदानात अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. डर्बीकडून खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने आफ्रिदाला बाद केले. बाद होण्यापूर्वी आफ्रिदीने संघासाठी १०१ धावांचे योगदान दिले. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर हॅम्पशायरने निर्धारीत २० षटकात ८ बाद २४९ धावा केल्या होत्या.

या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना डर्बीशायरचा डाव १९.५ षटकात १४८ धावांत कोलमडला. आफ्रिदीने जेवढ्या धावा केल्या अगदी तेवढ्याच म्हणजे १०१ धावांनी हॅम्पशायरने हा सामना जिंकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आफ्रिदीने एकूण ९८ सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व केलंय. पण त्याला एकदाही शतकी खेळी करता आली नव्हती. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.