भारतीय संघाचा युवा गोलंदाज जसप्रित बुमराह याने टी २० गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. आयसीसीने नुकतेच टी-२० क्रिकेटची जागतिक क्रमवारी जाहीर केली. यामध्ये गोलंदाजांच्या यादीत पाकिस्तान संघातील अष्टपैलू इमाद वासिम ७८० गुणासह बाजी मारली आहे. तर ७६४ गुणांसह बुमराहने दुसरे स्थान मिळवले आहे. बुमराहनंतर या यादीत आफ्रिकेच्या इम्रान ताहिर (७४४), रशिद खान अफगाणिस्तान (७१७) आणि वेस्ट इंडिजच्या सॅम्युअल बद्री (७१७) या खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहली ७९९ गुणांसह फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन अॅरॉन पिंच (७८७), न्यूझीलंडचा केन विल्सन (७४५), ऑस्ट्रेलियाचा ग्लॅन मॅक्सवेल (७१८) आणि इंग्लंडचा जो रुट (६९९) पाचव्या स्थानावर आहे. फलंदाजीमध्ये तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या मॅक्सवेलने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. या यादीत बांगलादेशच्या शकिब अल हसन याने ३५३ गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे. तर भारतीय संघातील युवराज सिंगला पाचवे स्थान मिळाले आहे.

टी-२० क्रिकेटमधील जागतिक क्रमवारीच्या यादीत फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश असला तरी भारतीय संघाला मात्र चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. संघ यादीचा विचार केल्यास या यादीत न्यूझीलंड अव्वल स्थानी असून पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. संघाच्या क्रमवारीत भारतीय संघ इंग्लंडनंतर चौथ्या स्थानावर आहे. भारतीय संघानंतर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या संघाचा क्रमांक लागतो.