गतविजेत्या इंग्लंडला श्रीलंकेने हरविल्यानंतर आता भारतीय संघही इंग्लंडवर मात करीत महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सुपरसिक्स गटात स्थान मिळविण्यासाठी उत्सुक झाला आहे. रविवारी भारत व इंग्लंड यांच्यात येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना होत आहे.
भारताने उद्घाटनाच्या सामन्यात वेस्ट इंडिजवर १०५ धावांनी मात केली होती. या सामन्यातील विजयामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. अनुभवी खेळाडू मिताली राज हिच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या लढतीत सर्व आघाडय़ांवर प्रभावी कामगिरी केली आहे. मुरुगेसन तिरुशकामिनी हिने केलेले शतक व तिने पूनम राऊत हिच्या साथीत सलामीसाठी केलेली १७५ धावांची भागीदारी हे भारताच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले होते. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यासाठी भारतास या जोडीवर अवलंबून राहावे लागणार आहे. इंग्लंडने आतापर्यंत तीन वेळा विजेतेपद मिळविले आहे. त्यांच्याविरुद्ध मायदेशात झालेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-२ असा विजय मिळविला होता.
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवामुळे इंग्लंड संघावर दडपण आले आहे. स्पर्धेतील आव्हान टिकविण्यासाठी त्यांना भारताविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळविण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करतील असा अंदाज आहे. इंग्लंडकडे अनुभवी फलंदाजांची कमतरता नाही मात्र गोलंदाजीत त्यांना अजूनही चांगल्या कामगिरीची आवश्यकता आहे.
भारताची कर्णधार मिताली राज हिने उद्याच्या सामन्याबाबत आत्मविश्वास व्यक्त करीत सांगितले, लंकेने इंग्लंडला हरविल्यामुळे आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. अर्थात आम्ही गाफील राहणार नाही.