पहिल्या एकदिवसीय सामन्यात ९६ धावांनी विजय मिळवल्यावर शुक्रवारी होणाऱ्या बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्धचा दुसरा सामना जिंकून मालिका विजयाचे लक्ष्य भारतीय ‘अ’ संघाने डोळ्यापुढे ठेवले आहे.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने गुरकीरट सिंगच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर दमदार विजय मिळवला होता. गुरकीरटने ६५ धावांसह बांगलादेशचा अर्धा संघ माघारी धाडण्याची किमया साधली होती, त्यामुळे त्याच्याकडून भारतीय संघाच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. पण भारताच्या मुख्य फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नव्हती. सुरेश रैनाकडून पहिल्या सामन्यात मोठय़ा अपेक्षा होत्या, पण त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याचबरोबर कर्णधार उन्मुक्त चंदलाही गेल्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. केदार जाधवला गेल्या सामन्यात भोपळाही फोडता आला नव्हता, तर मनीष पांडेला फक्त एकच धाव करता आली होती. पहिल्या सामन्यात नापास झालेल्या या फलंदाजांना दुसऱ्या सामन्यात चमकदार कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधण्याची ही सुवर्णसंधी असेल. यष्टीरक्षक संजू सॅमसन कामगिरीमध्ये सातत्य राखतो का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

संघ
भारत ‘अ’ : उन्मुक्त चंद (कर्णधार), मयांक अगरवाल, मनीष पांडे, सुरेश रैना, केदार जाधव, संजू सॅमसन, करुण नायर, कुलदीप यादव, कर्ण शर्मा, रिषी धवन, श्रीनाथ अरविंद, धवल कुलकर्णी, रुष कालरा आणि गुरकीरट सिंग मान.
बांगलादेश ‘अ’ : मोमिनुल हक (कर्णधार), अनामुल हक बिजॉय, रॉनी तालुकदार, लिट्टॉन कुमार दास (यष्टीरक्षक), सब्बीर रहमान, सौम्या सरकार, नसीर होसेन, अराफत सन्नी, साकलेन साजिब, शुव्हागता होम, रुबेल होसेन, तस्किन अहमद, अल अमिन होसेन, शफिऊल इस्लाम, जुबैर होसेन.