पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या,’स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला भारतीय क्रिकेट संघाने आपला पाठींबा दर्शवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या पाचव्या वन-डे सामन्याआधी बीसीसीआयने भारतीय संघातील काही निवडक सदस्यांचा खास व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर टाकला आहे. अजिंक्य रहाणे, रोहीत शर्मा, कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारत स्वच्छ करण्याच्या मोहीमेसाठी एक विशेष संदेश दिला.

याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीनिमीत्त राबवण्यात येणाऱ्या अभियानासाठी खास व्यक्तींना पत्र लिहीलं होतं. या अभियानात सहभागी होत आपणही स्वच्छतेच्या कामात हातभार लावावा असं आवाहन मोदींनी या पत्राद्वारे केलं होतं. अजिंक्य रहाणेलाही मोदींनी पत्र लिहून आपल्या या अभियानात सहभागी होण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देत भारतीय संघाने विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मैदानावर एक विशेष व्हिडिओ शूट करत या अभियानाला आपला पाठींबा दर्शवला आहे.

अवश्य वाचा – मोदींच्या निमंत्रणानंतर अजिंक्य रहाणे स्वच्छतेसाठी मैदानात उतरणार

पहिले ३ सामने जिंकल्यानंतर भारताच्या विजयरथाला कांगारुंनी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात जोरदार धक्का दिला. या पराभवामुळे भारताने आयसीसीच्या वन-डे जागतिक क्रमवारीतलं आपलं पहिलं स्थानही गमावलं आहे. त्यामुळे हे स्थान परत मिळवण्यासाठी नागपूरच्या आजच्या सामन्यात भारतासाठी विजय मिळवणं महत्वाचं आहे. त्यामुळे या अखेरच्या सामन्यात भारत योग्य संघनिवड करुन ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला कसं तोंड देतं हे पहावं लागणार आहे.