विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेसाठी उज्ज्वल भवितव्य लाभलेला संघ म्हणून नवोदित अफगाणिस्तानकडे पाहिले जात आहे. १९९५मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट महासंघाची स्थापना झाली. (हल्लीचे अफगाणिस्तान क्रिकेट मंडळ) २००१मध्ये आयसीसीचे सदस्यत्व त्यांना मिळाले. त्याच वर्षी त्यांच्या राष्ट्रीय संघाची k09उभारणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी झपाटय़ाने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती केली आहे. २००६मध्ये त्यांनी इंग्लंडमधील दौऱ्यात सात सामने खेळले व त्यापैकी सहा सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळाला. हे सामने त्यांनी विविध कौंटी संघाच्या दुसऱ्या फळीतील संघांबरोबर खेळले होते तरीही स्पर्धात्मक अनुभव मिळविण्यासाठी त्यांना हा दौरा खूपच उपयुक्त ठरला.
मे २००८मध्ये आयसीसी जागतिक क्रिकेट लीग स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत अफगाणिस्तानने २०१०मध्ये झालेल्या आयसीसी ट्वेन्टी-२० स्पर्धेत स्थान मिळवले. त्यांची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. त्याच वर्षी त्यांनी आंतरखंडीय स्पर्धेत विजेतेपद मिळवताना अंतिम फेरीत स्कॉटलंडला पराभवाचा धक्का दिला होk04ता. त्यांनी आशिया विरुद्ध कॅरेबियन ट्वेन्टी-२० स्पर्धेत विजेतेपद मिळवत आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला. या स्पर्धेत त्यांनी त्रिनिदाद व टोबॅको, बांगलादेश व बार्बाडोस अशा मातब्बर संघांना पराभवाची चव चाखावयास दिली. २०११च्या विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. स्पर्धात्मक खेळाचा फारसा अनुभव नसल्यामुळे या फेरीत त्यांची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही. २०१२मध्ये झालेल्या आयसीसी ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्यांनी उपविजेतेपद मिळवत मुख्य फेरीत स्थान मिळवले. मात्र तिथे इंग्लंड व भारतापुढे त्यांचा निभाव लागला नाही व साखळी गटातच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी २०१३मध्ये घेण्यात आलेल्या जागतिक क्रिकेट लीगमध्ये त्यांनी उपविजेतेपद मिळवताना केनियावर सनसनाटी विजय मिळवला. या स्पर्धेतील १४ सामन्यांपैकी नऊ सामने त्यांनी जिंकले. या स्पर्धेतील उपविजेतेपदामुळे त्यांनी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. अफगाणिस्तानचे खेळाडू नवोदित असले तरी त्यांनी आजपर्यंत बांगलादेश, केनिया व झिम्बाब्वे या संघांविरुद्ध काही सामने िंजंकले आहेत. त्यांची ही कामगिरी भावी यशाची झलकच आहे.

बलस्थान व कच्चे दुवे
अफगाणिस्तान म्हटले की सतत आपल्यासमोर युद्धाचेच चित्र दिसते. सतत दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे कायमच दडपणाखाली राहणाऱ्या लोकांमध्ये क्रिकेटचे चांगले नैपुण्य आहे, हे पाकिस्तानचे माजी खेळाडू कबीर खान यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी अनुभवी व युवा खेळांडूबरोबरच अष्टपैलू खेळाडूंचा संघात समावेश असेल यावर भर दिला आहे. त्यामुळेच त्यांचा संघ समतोल मानला जात आहे. कर्णधार मोहम्मद नबी, समीउल्ला शेनवारी, नवरोझ मंगल यांच्याकडे आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. मोहम्मद नबी, समीउल्ला शेनवारी हे दोघेही अनुभवी अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे संघाची मुख्य मदार त्यांच्यावर आहे. मात्र अफगाणिस्तानची ही पहिलीच विश्वचषकाची मुख्य स्पर्धा असल्यामुळे त्यांच्यावर मानसिक दडपण राहणार आहे. तसेच अव्वल दर्जाच्या संघांशी खेळण्याचा फारसा अनुभव नाही ही आणखी एक समस्या त्यांच्यापुढे असणार आहे.

अपेक्षित कामगिरी
या स्पर्धेत पदार्पण करीत असल्यामुळे साखळी गटापुरतेच त्यांचे आव्हान राहणार आहे. स्कॉटलंड व बांगलादेश यांच्याविरुद्ध ते विजय मिळवू शकतील; मात्र त्यासाठी त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. अन्य संघांविरुद्ध त्यांचा निभाव लागणे कठीण आहे.

संकलन : मिलिंद ढमढेरे