गजतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स संघाला विजयापासून पुन्हा एकदा वंचित रहावे लागले. तेलुगू टायटन्स संघाने जयपूरचा ३२-२२ असा अकरा गुणांनी पराभव केला. बंगळुरू बुल्स संघाने सुरुवातीपासून खेळावर नियंत्रण मिळवित दिल्ली दबंग संघावर ३३-१८ अशी सहज मात करीत प्रो कबड्डी लीगमध्ये सफाईदार विजय मिळविला.
जयपूरवर तेलुगु टायटन्स संघाने सहज विजय मिळवला. पूर्वार्धातील ८-७ अशा केवळ एक गुणाच्या आघाडीनंतर तेलुगु संघाने उत्तरार्धात चौफेर खेळ करीत सहज विजय मिळविला. त्याचे श्रेय राहुल चौधरीने नोंदविलेल्या अकरा गुणांना द्यावे लागेल. त्याने चढाईत नऊ गुण नोंदविले, तर पकडीत त्याला दोन गुण मिळाले. सुकेश हेगडेने चढाईत सात गुण मिळविले, तर दीपक हुडाने पकडीत पाच गुण मिळवित तेलुगु संघाच्या विजयात हातभार लावला. जयपूर संघाचा महत्त्वाचा खेळाडू जसवीरसिंगला या सामन्यात सूर सापडला नाही. राजेश नरेवालने चढाईत दोन बोनस गुणांसह ८ गुण नोंदविले तसेच त्याने पकडीत एक गुण मिळविला. कुलदीपसिंगने दोन बोनस गुणांसह पाच गुण नोंदविले.
बंगळुरू संघाने दिल्लीविरुद्ध खेळताना पूर्वार्धात १७-८ अशी आघाडी घेतली होती. खोलवर चढाया व उत्कृष्ट पकडी असा बहारदार खेळ करीत बंगळुरू संघाने दिल्लीच्या खेळाडूंना फारशी संधी दिली नाही. उत्तरार्धातही बंगळुरू संघाने वर्चस्व राखले. बंगळुरुच्या मनजित चिल्लरने चढाईत एक बोनस गुणासह आठ गुण तसेच पकडीत एक गुण अशी अष्टपैलू कामगिरी केली. अजय ठाकूरने उत्तरार्धात एका चढाईत तीन गुण वसूल करीत त्याला चांगली साथ दिली. पकडीत बंगळुरू संघाच्या सोमवीर शेखरने दोन वेळा ‘सुपर टॅकल’ करीत एकूण सहा गुणांची कमाई केली. दिल्ली संघाकडून रोहितकुमार चौधरीने चढाईत सहा गुण नोंदविले, तर रवींदर चहाल याने पकडीत चार गुण मिळविले.