मुंबई, दिल्ली, जयपूर आणि कोलकाता अशा चार शहरांच्या पहिल्या टप्प्यानंतर प्रो-कबड्डी लीग अध्र्यावर येऊन ठेपली आहे. ‘सत्ते पे सत्ता’चा नारा बुलंद करीत ७ पैकी ७ सामने जिंकणारा गतउपविजेता यू मुंबाचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर ७ पैकी ५ सामने जिंकण्याची किमया साधणाऱ्या तेलुगू टायटन्सच्या भूमीवर मंगळवारपासून दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होणार आहे. घरच्या मैदानावर उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याचे प्रमुख आव्हान असताना तेलुगू टायटन्सने कर्णधारपदाचा भार आश्चर्यकारकरीत्या इराणच्या मेराज शेखकडे सोपवला आहे. तेलुगू टायटन्सने आतापर्यंतचा प्रवास आत्मविश्वासाने केल्यानंतर आता विजेतेपदाची लढाई अधिक तीव्र असताना ‘इराणी रणनीती’चा वापर करण्याचे निश्चित केले आहे.
मागील वर्षी आशियाई क्रीडा स्पध्रेच्या सुवर्णपदकाच्या लढतीत भारताला इराणने झगडायला लावले होते. त्यामुळे इराणच्या हादी ओश्तोरॅक आणि मेराज यांना काही महिन्यांपूर्वी झालेल्या लिलावामध्ये सर्वाधिक २१ लाख रुपयांचा भाव मिळाला होता. परंतु दुर्दैवाने मुंबईतील पहिल्याच सामन्यात हादीला दुखापत झाल्यामुळे त्याला खेळता आले नव्हते. परंतु दुखापतीतून सावरलेला ओश्तोरॅक आणि मेराज यांच्यावर हैदराबादच्या टप्प्यात आमची मदार असेल, असे तेलुगू टायटन्सचे प्रशिक्षक जे. उदय कुमार यांनी सांगितले.
‘‘मागील हंगामात चढायांचे सर्वाधिक गुण मिळवण्याची किमया साधणाऱ्या राहुल चौधरीकडे हंगामाच्या प्रारंभी तेलुगू टायटन्सचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. परंतु कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे कामगिरीवर परिणाम होत असल्याचे त्याने संघव्यवस्थापनाला सांगितले. त्यामुळे २१ वर्षीय दीपक कुमार हुडाला कर्णधार करण्यात आले होते. मात्र आता हैदराबादच्या महत्त्वाच्या टप्प्यात आम्ही मेराजकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे उदय कुमार यांनी सांगितले.
रविवारी पाटण्याला झालेल्या सामन्यात पाटणा पायरेट्सला बंगाल वॉरियर्सने २०-२० असे बरोबरीत रोखले. प्रो-कबड्डीच्या दुसऱ्या हंगामातील ही पहिली लढत बरोबरीत सुटली. राहुल चौधरी, सुकेश हेगडेसारखे भारताचे अनुभवी खेळाडू याचप्रमाणे मेराज शेख, हादी ओश्तोरॅक यांच्यासारखे इराणी खेळाडू यजमान तेलुगू टायटन्स संघात आहेत. हैदराबादच्या गचीबोली इनडोअर स्टेडियमवर तेलुगू टायटन्स हा संघ जयपूर पिंक पँथर्स, बंगाल वॉरियर्स, पाटणा पायरेट्स आणि पुणेरी पलटण यांच्याविरुद्ध लढणार आहे.

कबड्डीरसिकांसाठी खास सुविधा
‘‘प्रो-कबड्डी लीगने मुंबईतील पहिल्या चार दिवसांतच तिकीट दरांमध्ये आयपीएल क्रिकेटची बरोबरी केली होती. मुंबईत एनएससीआय येथे झालेल्या सामन्यांत सर्वात कमी दराचे तिकीट ७०० रुपयांना होते. मात्र शनिवार-रविवारी हेच तिकीट ८०० रुपयांना विकले जात होते. मात्र हैदराबादच्या गचीबोली इनडोअर स्टेडियमवर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सामन्यांसाठी मात्र तेलुगू टायटन्सने तिकीट दरात सवलत, ३०० तिकिटे मोफत आणि खास बसेसची घोषणा करीत कबड्डीरसिकांना खूश केले आहे.
साडेतीन हजार प्रेक्षक क्षमतेच्या या स्टेडियममधील दोन हजार तिकिटे विक्रीकरिता ठेवण्यात आली आहेत. सर्वात स्वस्त तिकीट ३०० रुपयांचे असेल. याचप्रमाणे दररोज ३०० तिकिटे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मोफत देण्यात येणार आहेत. याशिवाय हैदराबाद शहरातून प्रो-कबड्डी पाहण्यासाठी गचीबोली येथे येणाऱ्या प्रेक्षकांना खास बसेसची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे,’’ अशी माहिती तेलुगू टायटन्स संघाचे मालक श्रीनिवासन श्रीरमणे यांनी दिली.