भारताचा सार्वकालीन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलदेव यांनी प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अपेक्षाभंग केला होता. ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील अनुभव मांडताना कपिल यांनी निराशा केल्याचा दावा सचिनने केला आहे. या दौऱ्यावरील व्यूहरचना आखण्यात कपिल कधीच सहभागी झाले नव्हते, असे सचिनने नमूद केले आहे.
नोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००० या कालावधीत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावर आधारित असलेल्या प्रकरणात कपिल यांच्याकडून माझ्या बऱ्याच अपेक्षा होत्या, असे सचिनने नमूद केले आहे.
‘‘माझ्या कर्णधारपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात कपिलदेव प्रशिक्षक म्हणून लाभले. भारताचे ते एक महान क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. संघाची आखणी करण्याचे महत्त्वाचे कार्य प्रशिक्षकाचे असते. ऑस्ट्रेलियासारख्या खडतर दौऱ्यावर कपिल यांच्यापेक्षा अधिक चांगले मार्गदर्शन कुणाचे लाभू शकले असते,’’ असा सवाल सचिनने या प्रकरणात विचारला आहे.
सचिनने पुढे लिहिले आहे की, ‘‘कपिल यांची समावेशाची पद्धती आणि विचारप्रक्रिया मर्यादित ठेवत. त्यामुळे व्यूहरचना आखण्याच्या चर्चेपासून ते अलिप्त राहात. मैदानावर आम्हाला ही उणीव प्रकर्षांने भासायची.’’
कर्णधारपदावरून तडकाफडकी हकालपट्टी करणे हे अपमानजनक -सचिन
१९९७ मध्ये कर्णधारपदाची कारकीर्द वाईट पद्धतीने संपुष्टात  आली. या वेदनासुद्धा सचिनने या पुस्तकात मांडल्या आहेत. कर्णधारपदावरून तडकाफडकी हकालपट्टी करणे हे अपमानजनक होते, असे सचिनने आत्मचरित्रात म्हटले आहे. ‘‘श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर माझी कर्णधारपदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. प्रसारमाध्यमाच्या एका प्रतिनिधीकडून तू आता कर्णधार नाहीस, हे सांगण्यापूर्वी मला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून याबाबत कोणीही कळवण्याची तसदी घेतली नव्हती,’’ असे सचिनने लिहिले आहे. सचिनने पुढे म्हटले आहे की, ‘‘मी तेव्हा साहित्य सहवासमध्ये माझ्या मित्रासोबत होतो. मला जेव्हा हे वृत्त कळले, तेव्हा मला अतिशय अपमानजनक वाटले. ही गोष्ट अशा पद्धतीने हाताळणे योग्य नाही.’’