टेनिसविश्वातली सगळ्यात कठीण समजल्या जाणाऱ्या फ्रेंच खुल्या स्पर्धेला आजपासून सुरुवात होते आहे. कौशल्य, तंदुरुस्ती आणि संयमाचा कस पाहणाऱ्या लाल मातीवरली ही स्पर्धा म्हणजे दर्जेदार खेळाची पर्वणी. यंदा लाल मातीवर इतिहास बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राफेल नदालची लाल मातीवरची k04एकाधिकारशाही यंदा संपुष्टात येऊ शकते. महिलांमध्ये सेरेना विल्यम्सच्या सद्दीला वेसण बसण्याची प्रबळ शक्यता आहे. आठवडय़ाभरानंतरच्या द्वंद्वानंतर समोर येणाऱ्या विजेत्यांच्या चौकटीत आता नव्या चेहऱ्यांची भर पडू शकते. वर्षांतल्या दुसऱ्या आणि मानाच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचा घेतलेला हा आढावा.
नदाल मावळतीला..
अफाट ऊर्जा, चिवट झुंज देण्याची विजिगीषू वृत्ती आणि ताकदवान खेळ हे राफेल नदालच्या खेळाचे वैशिष्टय़. हार्ड आणि ग्रास कोर्टवर साधारण प्रदर्शन करणारा नदाल क्ले कोर्टवर अक्षरक्ष: अजिंक्य होतो. चेंडू संथ येणाऱ्या क्ले कोर्ट म्हणजे नदालचे माहेरघर. इथे हुकमत चालते नदालचीच. २००५ ते २०१५ या दशकात फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या दहापैकी नऊ जेतेपदांवर नदालचे नाव आहे. मात्र नवीन वर्षांत नदालची गाडी उतरणीला लागली आहे. कतार स्पर्धेत गतविजेत्या नदालला पहिल्याच फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. वर्षांतल्या पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत नदालने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. मात्र कोणत्याही लढतीत तो लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पाठदुखी बळावल्याने नदालला सर्वोत्तम खेळ करता आला नाही आणि टॉमस बर्डीचने विजय साकारला. दहाहून अधिक वर्ष आंतरराष्ट्रीय टेनिस खेळणाऱ्या नदालला पाठ, गुडघे, खांद्याने चांगलंच सतावलं आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तर प्रदीर्घ काळ त्याला खेळापासून दूर राहावं लागलं होतं. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतला पराभव विसरून, खेळावर आणि तंदुरुस्तीवर मेहनत घेत नदाल तयारीला लागला. क्ले कोर्टवरच होणाऱ्या रिओ स्पर्धेत नदालला फॅबिओ फॉगनिनीने उपांत्य फेरीत नमवले. फ्रेंच खुल्या स्पर्धेची रंगीत तालीम असणाऱ्या या स्पर्धेत नदालने जेतेपद पटकावणे अपेक्षित होते. मात्र तसं झालंच नाही. हा पराभव बाजूला सारत नदालने दिमाखदार कामगिरी करत अर्जेटिना स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई केली. नदालला सूर गवसला असं वाटतंय तोच रोम मास्टर्स स्पर्धेत स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने सरळ सेट्समध्ये नदालला चीतपट केले. फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अवघ्या आठवडाभरापूर्वी झालेल्या या दारुण पराभवाने नदालच्या स्पर्धेसाठीच्या मानांकनावरही परिणाम झाला आहे. नदालसारख्या सार्वकालीन महान खेळाडूला खेळावं कसं हे कोणी सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र सध्या दुखापतींमुळे त्याच्या खेळातलं सातत्य हरपलं आहे, गायकाला मनाजोगती हरकत दिसते, पण गळ्याची साथ नसल्यामुळे घेता येत नाही तसं काहीसं नदालचं झालं आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेत देदीप्यमान प्रदर्शन असूनही यंदा नदालला सहावे मानांकन देण्यात आले आहे. यावरून ब्रँड नदाल किती ओसरलाय याची कल्पना यावी. सामन्यात कोणत्याही क्षणी पुनरागमन करणाऱ्या नदालला रोखायचे असेल तर फेडरर आणि जोकोव्हिच यांना ही सुवर्णसंधी आहे. वाढतं वय आणि हालचालीत आलेले शैथिल्य यांना लपवत फेडररला चमत्कार घडवावा लागेल. गेल्या अडीच वर्षांत फेडररला एकाही ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा करता आलेला नाही. नवख्या खेळाडूंनीही त्याला नमवण्याची किमया केली आहे. लोकांनी आता पुरे म्हणण्यापेक्षा फेडररने सन्मानाने खेळाला अलविदा करावा अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. फेडररच्या नावावर तब्बल १७ ग्रँडस्लॅम जेतेपदं आहेत, मात्र त्यातलं केवळ एक फ्रेंच खुल्या स्पर्धेचं आहे. टेनिसमधल्या सगळ्यात अवघड परीक्षेत यश मिळवत निवृत्ती स्वीकारण्याचा फेडररचा मानस असू शकतो. नदाल आणि फेडरर यांच्या अभेद्य साम्राज्याला भेदत जोकोव्हिचने स्वत:चा ठसा उमटवला. जोकोव्हिचकडे नदालसारखी ताकद आणि ऊर्जा नाही किंवा फेडररसारखी नजाकत नाही, परंतु त्याची अशी खास शैली आहे. छोटय़ा छोटय़ा गोष्टी अचूक करत, संघर्ष करत, चाहत्यांच्या पाठिंब्याच्या मदतीने जिंकणं जोकोव्हिचची खासियत आहे. हार्ड आणि ग्रास दोन्ही कोर्ट्सवर जोकोव्हिचने ग्रँडस्लॅम जेतेपदं  पटकावली आहेत. मात्र क्ले कोर्टवरच्या ग्रँडस्लॅम जेतेपदाने सातत्याने त्याला हुलकावणी दिली आहे. नदाल आणि फेडररविरुद्ध असंख्य मॅरेथॉन लढती गाजवणाऱ्या जोकोव्हिचला यंदा खऱ्या अर्थाने ग्रँडस्लॅम जेतेपदांचं वर्तुळ पूर्ण करण्याची संधी आहे.
दुय्यम ते अव्वल
अँडी मरे आणि स्टॅनिसलॉस वॉवरिन्का यांनी दुसऱ्या फळीतल्या खेळाडूंची प्रतीक्षा संपुष्टात आणत आपणही ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावू शकतो हा विश्वास दिला आहे. आता या दोघांचा प्रयत्न आहे जेतेपदांमध्ये सातत्य राखण्याचा. अ‍ॅमेली मॉरेस्मोच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा अँडी मरे यंदा किमयागार ठरू शकतो. वॉवरिन्काने कौशल्याला मेहनतीची जोड देत कमीतकमी चुकांसह खेळ केल्यास स्वित्र्झलडचा आणखी एक तारा टेनिसविश्वावर तळपू शकतो. या दोघांव्यतिरिक्त जपानचा केई निशिकोरी आणि अमेरिकेच्या मारिन चिलीच यांनी विशेष प्रभावित केले आहे. वर्षांनुवर्षे डेव्हिड फेरर ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या उपांत्य फेरीपर्यंत धडक मारतो आहे. नदालसारखाच ताकदवान खेळाचा माहिर फेरर प्रस्थापितांना धक्का देऊ शकतो.
सेरेना हरेना
गतविजेत्या सेरेना विल्यम्सला नमवणे हे अन्य महिला टेनिसपटूंसाठी नेहमीच खंडप्राय आव्हान राहिले आहे. गेल्या वर्षी सौंदर्यवती मारिया शारापोव्हाने जेतेपदाला गवसणी घालत कारकीर्दीत ग्रँडस्लॅम जेतेपदांचे वर्तुळ पूर्ण केले. यंदाच्या वर्षांतील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर सेरेनाने नाव कोरले होते. तंदुरुस्तीचा मुद्दा सेरेनासाठी कळीचा आहे तर ताकदवान खेळ हा शारापोव्हाच्या खेळातला कच्चा दुवा आहे. यामुळे सेरेना आणि मारिया हा मुकाबला रंगतदार होणार आहे. अ‍ॅग्निेझेस्का रडवान्सका, पेट्रा क्विटोव्हा, सिमोन हालेप, अ‍ॅना इव्हानोव्हिक यापैकी कोणालाही जेतेपदावर नाव कोरायचे असेल तर खेळात प्रचंड सातत्य आणावे लागेल.
सानियावर आशा केंद्रित
दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी सानिया मिर्झा सालाबादप्रमाणे भारताचे आशास्थान आहे. यंदाच्या वर्षी शानदार फॉर्ममध्ये असलेली सानिया-हिंगिस जोडी जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. पुरुषांमध्ये रोहन बोपण्णा, महेश भूपती आणि लिएण्डर पेस यांच्यावर भारताची भिस्त आहे.
-पराग फाटक