भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब केले आहे. प्रशिक्षकपदाच्या करारासंबंधी हॉकी इंडिया व भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) यांच्याबरोबरची बोलणी फिस्कटल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. मात्र नव्याने प्रस्तावावर विचार केला जाण्याची शक्यता आहे.
वॉल्श यांची प्रशिक्षकपदाची मुदत बुधवारी संपत आहे. संघ निवड व सपोर्ट स्टाफकडून मिळणारे असहकार्य या कारणास्तव त्यांनी गेल्या महिन्यातच आपल्या पदाचा त्याग केला होता. त्यानंतर त्यांनी मंगळवारी  केंद्रीय क्रीडा मंत्री सरबनंदा सोनवाल यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. मात्र ही चर्चा फारशी फलदायी न ठरल्यामुळे त्यांनी राजीनाम्यावर शिक्कामोर्तब करत मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. वॉल्श यांच्याकडे नव्याने प्रस्ताव लवकरच पाठविला जाणार आहे.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ. नरिंदर बात्रा यांनी सांगितले, ‘‘वॉल्श हे अमेरिकेत प्रशिक्षक म्हणून काम करत असताना तेथे त्यांचा आर्थिक गैरव्यवहारात समावेश असल्याचे लक्षात आले आहे. तसेच हॉकी इंडियाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांचा सुसंवाद राहिलेला नाही. त्यामुळेच त्यांना पुन्हा करारबद्ध करण्याबाबत आम्ही उत्सुक नाही.’’