नेपाळविरुद्ध होणाऱ्या आगामी लढतीसाठी भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे भारताचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टटाइन यांनी सांगितले.
२०१८मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीतील पहिला सामना गुवाहाटी येथे १२ मार्च रोजी होणार आहे. या सामन्यात भारताची नेपाळ संघाशी गाठ पडणार आहे. याबाबत कॉन्स्टटाइन म्हणाले, ‘‘सुनील छेत्री याने यापूर्वीच्या सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषविले असले तरीही त्याच्याकडेच पुन्हा ही जबाबदारी दिली जाईल असे गृहीत धरणे चुकीचे होईल. संघातील सर्व खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निमंत्रित केले जाईल. या शिबिरातील कामगिरीच्या आधारे कर्णधारपदाचा निर्णय घेतला जाईल.’’