महेंद्रसिंग धोनी ज्या सामन्यात कप्तानी करायचा त्या सामन्यात भारतीय संघ विजयाचे सोने करायचा, पण गेल्या काही कसोटी मालिकांतील पराभव पाहता, त्याचा ‘मिडास टच’ हरवतो आहे का, हा प्रश्न पडला आहे.
२००७ साली धोनीने भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकवून दिला, त्यानंतर गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकही भारताने त्याच्या नेतृत्वाखाली पटकावला, कसोटीमध्ये अव्वल क्रमांकही त्याच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाने पटकावला. पण गेल्या वर्षभरात मात्र त्याला विजयासाठी झगडावे लागत आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर धोनीच्या कप्तानीखाली भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. सध्या मायदेशातील कसोटी मालिकेतही भारतीय संघ १-२ असा पिछाडीवर आहे. त्यामुळे धोनीचा ‘मिडास टच’ हरवतोय का, हीच चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे.