लढण्याची, संघर्षांची जराही इच्छा न दर्शवता सुमार कामगिरीसह मानहानीकारक पराभवाला सामोरा जावा लागणारा भारतीय क्रिकेट संघ इंग्लिश प्रसारमाध्यमांचे लक्ष्य ठरला आहे. भारतीय संघाने लॉर्ड्स कसोटी जिंकत मालिकेत १-० आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर सुमार प्रदर्शनामुळे भारतावर मालिका गमावण्याची वेळ आली अशी टीका इंग्लंड प्रसारमाध्यमांनी केली.

भारताच्या फलंदाजांकडे तंत्रकुशलतेचा अभाव होता. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या सुरेख स्विंग करणाऱ्या गोलंदाजांचा सामना करण्याचे धैर्य त्यांनी दाखवले नाही. इंग्लंडच्या धारदार खेळाचे भारतीय फलंदाज बळी ठरले.
-डेली टेलिग्राफ

कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारांमधील सर्वोत्तम फलंदाज अशी ख्याती घेऊन विराट कोहली इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. मात्र कसोटी मालिकेअखेरीस १३.४० ही सामान्य सरासरी पाहता ही ख्याती किती पोकळ होती याचा प्रत्यय आला. पुढचा सचिन तेंडुलकर असे त्याचे वर्णन केले जात होते. मात्र त्याची कामगिरी पाहता, असे उद्गार आता कोणी काढणार नाही.
-इंडिपेन्डंट